कोल्हापूर : कोल्हापुरातील दानोळी भागात नववी इयत्तेत शिकणाऱ्या तरुणीच्या धाडसाची अनोखी घटना समोर आली आहे. एका बाजूला दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यात सर्वजण व्यग्र असताना दुसरीकडे एक ३ वर्षीय मुलगा विहिरीत पडला. मात्र त्याचवेळी भल्या-भल्यांना जे करता आलं नसतं ते एका १५ वर्षीय मुलीने करून दाखवत त्या मुलाचा जीव वाचवला आहे. यामुळे सध्या तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. नम्रता कलगोंडा कटारे असं या धाडसी मुलीचे नाव असून क्षणाचाही विचार न करता तिने खोल आणि पाण्यात काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी घेत लहानग्याचा जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, दानोळी-जयसिंगपूर रस्त्यालगतच्या कटारे मळ्यात कटारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबात ओजस कटारे (वय ५ वर्ष) आणि शौर्य कटारे (वय ३ वर्ष) अशी दोन मुले आहेत. काही दिवसांपूर्वीच विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगला. या अटीतटीच्या सामन्यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष आपल्या घरातील टेलिव्हिजनकडे होते. तशीच काही परिस्थिती कटारे कुटुंबातही होती. शिवाय नुकताच ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने येथील सर्व ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहत होते. अशा स्थितीत ओजस आणि शौर्य हे बाहेरील अंगणात असलेल्या विहिरीजवळ खेळत होते आणि याचवेळी अचानक शौर्य विहिरीत पडला आणि बुडू लागला.

अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या बाळ्या सिंगरचा मृत्यू, मासेमारी करताना शॉक लागला अन्…

यावेळी शौर्य विहिरीत बुडाला, असं म्हणत ओजसने आरडा-ओरड सुरू केली. हे ऐकून सर्वजण धावत विहिरीवर पोहोचले. मात्र काय करावं, हे कोणालाही समजत नव्हते. अशातच या दोघांची आत्या नम्रता कळकोंडा कटारे (वय १५ वर्ष) या नववीत शिकणाऱ्या मुलीने वेळ न दवडता थेट विहिरीत उडी घेतली आणि काही क्षणांतच ३ वर्षांच्या शौर्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे शौर्याचे प्राण थोडक्यात वाचले.

दरम्यान, संकटकाळात काय करावं, हे भल्याभल्यांना सुचलं नाही ते या नववी इयत्तेत शिकणाऱ्या पोरीने करून दाखवल्याने नम्रताचे सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच दानोळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रेया वांजोळे आणि अध्यक्ष राजकुमार पारज यांनी नम्रताने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करत तिचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here