जट्ट प्रभजोत दिल्लीहून कावासाकी निंजा एच टू बाईक घेऊन नेपाळला जाण्यास निघाला. पूर्ण प्रवासाचं चित्रिकरण त्याच्याकडून सुरू होतं. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर त्यानं बाईक सुसाट पळवली. पुढे बाईक मुख्यमंत्री कार्यालयाजवळून गेली. त्यावेळी प्रभजोतनं लोहिया द्वाराची प्रशंसा केली. लखनऊमध्ये प्रभजोतला त्याचे काही सोशल मीडिया फॉलोअर्स भेटले. प्रभजोतनं त्यांच्याशी संवाद साधला.
दिल्लीहून लखनऊमार्गे प्रभजोत नेपाळला पोहोचला. नेपाळमध्ये भरधाव वेगामुळे त्याचा अपघात झाला. त्याच्यासमोर अचानक एक ट्रक आला. बाईकचा वेग अतिशय जास्त असल्यानं प्रभजोतचं नियंत्रण सुटलं. त्याला बाईकचा वेग वेळीच कमी करता आला नाही. बाईक ट्रकला धडकली आणि प्रभजोत दूर जाऊन पडला.
प्रभजोतनं सेफ्टी किट परिधान केलं नव्हतं. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय मोडले. प्रभजोतच्या बाईकला झालेल्या अपघातात एका स्थानिक वृद्धाचा मृत्यू झाल्याचं काही नेपाळी नागरिकांनी ट्विट करून म्हटलं आहे. प्रभजोतला अपघाताच्या ६ तासांनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रभजोतला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ती ६ तास चालू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.