म. टा. प्रतिनिधी, पुणे
लॉकडाउनच्या कालावधीत एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क गेस्ट हाउसमध्ये राहण्याची सक्ती केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कर्मचाऱ्यांना गेस्ट हाउसमध्ये ठेवले जाणार असून, कामाच्या ठिकाणी त्यांची नेण्याची-आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी बॅग पॅक करूनच कामावर येण्याचे आदेश कंपनीने दिले आहेत.
नॅशनल इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट (नाइट्स) या संघटनेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. संघटनेकडे संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत इच्छेविरुद्ध गेस्ट हाउसमध्ये राहण्यास भाग पाडले जात आहे, त्यामुळे प्रचंड दबाव व मानसिक त्रास सहन करावा लागत असून, या आदेशाची पूर्तता न केल्यास नोकरी, पगारावर संकट येण्याची भीती कर्मचाऱ्यांना वाटत असल्याचे नाइट्सचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारपासून २३ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत आयटी कंपन्यांना १५ टक्के मनुष्यबळासह काम करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ‘कंपन्यांमध्ये पंधरा टक्केच कर्मचारी काम करतात की नाही, याची गणना कोण करणार,’ असा सवाल सलुजा यांनी केला. ‘आयटी, आयटी संबंधित सेवा, केपीओ, बीपीओ क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या काळात शंभर टक्के ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्याची मागणी आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. करोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी कंपन्यांकडून आवश्यक उपाययोजनांचे पालन केले जाते की नाही, हे देखील कर्मचाऱ्यांना माहिती नसते. कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कंपन्या सज्ज आहेत का, याची तपासणीही सरकारकडून केली जात नाही. त्यात असे प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांची पिळवणूक आहे,’ असा आरोपही सलुजा यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times