Water Taxi Mumbai To Mandava: वॉटर टॅक्सी (Water Taxi) सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे. जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरू केली होती. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटा दरम्यान ही सेवा सुरू आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

किती असेल भाडं

मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. यातून जवळपास २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. तसंच या टॅक्सीमध्ये एसीचीही सुविधा आहे.

गेट वे ऑफ इंडियापासून सेवा सुरू

लवकरच गेटवे ऑफ इंडियावरूनही वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. सध्या मांडवा दरम्यानच्या क्रुझ टर्मिनलवरून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. येत्या १० ते १५ दिवसांत गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटासाठी गेटवे ऑफ इंडिया इथून वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल.

उद्यापासून सुरू होणार बुकिंग

१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वॉटर टॅक्सीसाठीचं बुकिंग २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. उद्यापासून ऑनलाइन तिकीट बुक करता येऊ शकतं. सुरुवातीच्या काळात टॅक्सी सेवा सकाळी १०.३० पासून मुंबई क्रूझ टर्मिनलवरुन उपलब्ध होईल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या वेळेत बदल केला जाऊ शकतो. गेट वे ऑफ इंडियावरुन टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत ही सेवा सुरू राहिल.

बंद झाली होती वॉटर टॅक्सी सेवा

या वर्षातच फेब्रुवारीमध्ये मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. जलमार्गाने प्रवास करण्यासाठी हा एक चांगला पर्याय म्हणून याकडे पाहिलं जात होतं. पण मुंबईत जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या कनेक्टिव्हिटीचा अभाव, सुविधांचा अभाव आणि मुंबईतील जेटींपर्यंत पोहोचण्यासाठी आकारलं गेलेलं अधिक भाडं यामुळे मुंबईतील वॉटर टॅक्सी सेवा बंद करण्यात आली होती.

पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी

वॉटर टॅक्सी ऑपरेटर्सनी प्रवाशांसाठी क्रूझ टर्मिनलपर्यंत पोहोचण्यासाठी बस आणि टॅक्सी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते जेट्टीपर्यंत प्रत्येक ४० मिनिटांनी बस सेवा उपलब्ध करण्यात आली होती, पण हे अंतर १० मिनिटांपर्यंत असणं गरजेचं होतं. वॉटर टॅक्सी ऑपरेटर्सनी मुंबई पोर्ट ट्रस्टला (बीपीटी) पत्र लिहून टॅक्सींसाठी उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता १ नोव्हेंबरपासून मुंबईतून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here