रायगड : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणात अनेक मोठे हादरे बसले आहेत. भरत गोगावले यांच्यासह काही नेत्यांनी ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत असताना आता रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी केली असून नव्याने स्थापन झालेल्या सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा या भाजपच्या वाटेवर आहेत. रायगडचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांच्या त्या कन्या आहेत.

वसंतशेठ ओसवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि खासदार सुनिल तटकरे यांचेही जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या कन्या आता भाजपच्या वाटेवर असल्याने सुनिल तटकरे यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता आलेली नाही. राष्ट्रवादी पक्षाकडून विकासकामांसाठी निधी देण्यात आलेला नाही, अशा काही कारणांमुळे आपण भाजप प्रवेश करण्याचा विचार करत असल्याचे गीता पालरेचा यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारची कुंडली मांडणार? प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार, उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य

गीता पालरेचा यांनी यापूर्वी सुधागड-पाली पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा म्हणून देखील काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय अशी ओसवाल कुटुंबियांची ओळख आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुनिल तटकरे यांचे पुतणे आणि माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर आता सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनीही भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here