Bhaskar Jadhav : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्यं केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना कुडाळ (Kudal) पोलिसांकडून नोटीस आली आहे. याप्रकरणी भाजपनं तक्रार दाखल केली होती. यानंतर भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकेसंदर्भातील नोटीस बजावली आहे. भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात अपमानकारक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती संदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. या विरोधात महाविकास आघाडीनं कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चाच्या सभेत गुहागरचे आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल जनमानसात बदनामी अब्रूनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कुडाळ पोलिसांनी अटकेसंदर्भातील भास्कर जाधव यांना नोटीस बजावली आहे.

नोटिसीतील नमूद अटी-शर्तीचे काटेकोर पालन करावं

18 ऑक्टोबर ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांनी आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू केल्याचे कारण पुढे करून ACB कार्यालयावर मोर्चा काढला होता. सभेचे आयोजन करुन त्या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बदनामीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. यासंदर्भात भाजपने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. या फिर्यादीची दखल कुडाळ पोलिसांनी घेत भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील निवासस्थानी जाऊन काल अटकेसंदर्भातील 41 (अ) (1) अन्वये नोटीस बजावली. तपास कामात सहकार्य करावं असं या नोटिसीतील नमूद अटी-शर्तीचे काटेकोर पालन करावे अशा या आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी शिंदे व हवालदार सचिन गवस यांनी ही नोटीस बजावली आहे.

जाधव आणि राणे पिता-पुत्रांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. कोकणात पुन्हा शिवसेना उभारण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणात जाधव आणि राणे पिता-पुत्रांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली होती.  त्यानंतर काही दिवसांतच जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांच्या घरावरील कथित हल्ल्याचे गूढ उकलले? दिवाळीनंतर पोलिसांकडून खुलासा होण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here