Maharashtra Politics | हा वाद विकोपाला जात असतानाही शिंदे आणि फडणवीस मध्यस्थी का करत नाहीत, असा सवालही अनेकजण विचारत होते. अखेर शिंदे-फडणवीस यांनी राणा आणि कडू यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, शिंदे-फडणवीस यांनी हा पुढाकार अचानक घेतलेला नाही. त्यापूर्वी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्याची माहिती आता समोर आली आहे.

हायलाइट्स:
- बच्चू कडू यांनी २८ ऑक्टोबरला नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती
- कडू यांच्या या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर राजकीय चक्रं फिरली
बच्चू कडू यांनी २८ ऑक्टोबरला नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी रवी राणा यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच मी पैसे घेतल्याच्या आरोपाविषयी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले नाही तर वेगळा विचार करू, असा इशारा दिला होता. बच्चू कडू यांच्या या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर राजकीय चक्रं फिरायला सुरुवात झाली. सर्वप्रथम शिंदे गटातून दीपक केसरकर यांनी पुढे येत, बच्चू कडू यांना सबुरीने वागण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, प्रविण दरेकर आणि उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना फोन केला. हे प्रकरण वाढवू नका. त्याला (रवी राणा) शांततेत घ्या. मुख्यमंत्री म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांसोबत बोलतो, असे या नेत्यांनी कडू यांना सांगितले. त्यानंतर खऱ्या अर्थाने हा वाद मिटवण्यासाठी चक्रे फिरायला सुरुवात झाली. अखेर एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना मुंबईला भेटीसाठी बोलावून घेतले. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांच्या आजच्या भेटीत नेमकं काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रवी राणा यांच्या भेटीनंतर बच्चू कडू हेदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात किंवा शिंदे-फडणवीस यांच्याकडून बच्चू कडू आणि रवी राणा यांना समोरासमोर बसवून हा वाद मिटवला जाऊ शकतो. त्यादृष्टीने रवी राणा यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबतची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.