भाजप नेते राजकारण करू नका, असं आवाहन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७ एप्रिल २०१६ रोजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया संयोजक वाय. सतीश रेड्डींनी मोदींचा व्हिडीओ ट्विट केला आहे. ३१ मार्चला पश्चिम बंगालच्या कोलकात्यात एक निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता. ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. यानंतर मोदी कोलकात्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उड्डाणपूल दुर्घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं होतं.
काय म्हणाले होते मोदी?
निवडणुकीच्या दिवसांत पूल कोसळला आहे. हा देवानं लोकांना दिलेला संदेश आहे. आज हा पूल पडला आहे. उद्या या (ममता बॅनर्जी) अशीच अवस्था संपूर्ण बंगालची करतील. त्यामुळे देवानं हा संदेश दिला आहे. पश्चिम बंगालला वाचवा, असा संदेश देवानं या घटनेतून दिला आहे, असा शब्दांत मोदींनी एप्रिल २०१६ मध्ये उड्डाणपूल दुर्घटनेवरून राज्य सरकारवर टीका केली होती.
आता विरोधक काय म्हणताहेत?
गुजरातमधील केबल ब्रिज विधानसभा निवडणूक काही आठवड्यांवर आली असताना कोसळला. मोदींना यावरून एक मेसेज द्यायचा आहे, असं म्हणत तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया संयोजक वाय. सतीश रेड्डींनी मोदींचा २०१६ मधला व्हिडीओ ट्विट केला आहे. केलेलं कर्म परत येतं, असं म्हणत त्यांनी सणसणीत टोलाही हाणला आहे.