बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले. रवी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले होते. तसेच वेळ पडल्यास आपण शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडू, असे संकेतही दिले. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी राणा यांना मुंबईत भेटीसाठी बोलावले असून रवी राणा त्यानुसार मुंबईत दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलविल्यामुळे मी आज मुंबईला जात आहे, असे रवी राणा यांनी नागपूरहून मुंबईला रवाना होण्यापूर्वी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील राणा यांच्याशी संवाद साधणार असल्याचे कळते.
रवी राणा यांच्या भेटीनंतर बच्चू कडू हेदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, तसेच शिंदे-फडणवीस यांच्याकडून बच्चू कडू आणि रवी राणा यांना समोरासमोर बसवून हा वाद मिटवला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने रवी राणा यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबतची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस या दोघांचे मनोमीलन कसे घडवून आणणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.