‘राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण सरकारने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. गेल्या तीन महिन्यांत १.५४ लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन, तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क, आणि २२ हजार कोटींचा टाटा एअरबस असे तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून, बेरोजगारांना मिळणारे रोजगार हिरावले गेले आहेत. आपल्या देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
लाखो पदे रिक्त असतानाही सरकार नोकरभरती करत नाही. प्रकल्प बाहेर जात असल्याने खासगी क्षेत्रातही रोजगार उपलब्ध होत नाहीत. परिणामी राज्यातील तरुण हताश व निराश झाले आहेत’, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात पटोलेंसह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपूडकर आदींचा समावेश होता.
फडणवीसांवर टीकास्त्र
‘फडणवीस व भाजपने मोदी सरकारकडे जाऊन महाराष्ट्राची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली पाहिजे, यासाठी काय प्रयत्न केले ते सांगावे. दिल्लीतील वरिष्ठांच्या इशाऱ्यावर खाली मान घालून गप्प बसतात आणि वर ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या पद्धतीने वागतात’, अशी टीका यावेळी पटोले यांनी केली.