मोरबी (दीपक चित्रे) : गुजरातमधील मोरबी शहरातील मच्छू नदीवरील ब्रिटिशकालीन केबल पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी सोमवारी देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या ओरेवा समूहाच्या चार कर्मचाऱ्यांसह नऊ जणांना सोमवारी अटक करण्यात आली. या संस्थेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३४वर गेला आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

‘या नऊ जणांपैकी दोन व्यवस्थापक आहेत, तर दोन जण पुलाजवळील तिकीट बुकिंग क्लार्क आहेत. आम्ही सखोल चौकशी करु आणि दोषींना सोडणार नाही,’ असे राजकोट रेंजचे पोलीस महानिरीक्षक अशोक यादव यांनी सांगितले. तसेच पोलीस लवकरच प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देतील, असे सांगून त्यांनी तपशील देण्यास नकार दिला. इतर पाच आरोपींमध्ये ओरेवा समूहामध्ये काम केलेले दोन दुरुस्ती कंत्राटदार आणि पुलावर सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या तीन जणांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीपसिंह झाला यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले की, शहरातील घड्याळे आणि ई-बाइक बनवणाऱ्या ओरेवा समूहला पुलाचे नूतनीकरण आणि कामाचे कंत्राट देण्यात आले होते. तर मोरबीचे पोलिस अधीक्षक राहुल त्रिपाठी यांनी सांगितले की, रविवारी रात्री एफआयआर नोंदवल्यानंतर काही लोकांना प्राथमिक चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पुलावर कर्तव्यावर असलेल्या ओरेवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.

पोलिसांनी केबल पुलाची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या संस्थेविरोधात एफआयआर नोंदविला आहे, यात सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवधासाठी ठोठावलेली शिक्षा हत्येसाठी शिक्षा होत नाही.) आणि ३०८ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक प्रशासनाने मच्छू नदीवरील पुलाच्या देखभालीची जबाबदारी खासगी संस्थेकडे सोपवली होती. त्यामुळे मोरबी शहरातील मच्छू नदीवरील पूल जवळपास आठ महिन्यांपासून वापरात नव्हता. देखभालीचे काम पूर्ण झाल्यानंतर, संस्थेने २६ ऑक्टोबरला हा पूल नागरिकांसाठी खुला केला. ही दुर्घटना संस्थेतील लोकांच्या संवेदनाहीन वृत्तीमुळे घडली आहे. पुलाची देखभाल-दुरुस्ती, तसेच नूतनीकरणाच्या कामाकडे संबंधित व्यक्ती किंवा यंत्रणांनी लक्ष दिले नाही, असे मोरबी ‘बी’ विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश डेकीवाडिया यांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

खासदाराच्या १२ नातेवाइकांचा मृत्यू

गुजरातच्या राजकोटमधील भाजपचे लोकसभा सदस्य मोहन कुंडारिया यांनी सोमवारी सांगितले की, मोरबी पूल दुर्घटनेत त्यांच्या १२ नातेवाइकांचा मृत्यू झाला. कुंडारिया यांनी सांगितले की, ज्या नातेवाइकांचा मृत्यू झाला त्यात पाच मुले, चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व जण त्यांच्या मोठ्या भावाचे जवळचे नातेवाईक आहेत. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ‘माझ्या मोठ्या भावाच्या मेहुण्याच्या चार मुली, त्यांपैकी तिघींचे पती आणि पाच मुले अपघातात मरण पावली,’ असे कुंडारिया म्हणाले.

पंतप्रधान आज मोरबीला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी मोरबीला भेट देणार आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केले. गुजरातची राजधानी गांधीनगरपासून ३०० किमी अंतरावर असलेल्या मोरबीमध्ये बचावकार्य जोरात सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, हवाई दल आणि नौदलासह स्थानिक कर्मचारी बचावकार्यात गुंतले आहेत. सध्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी रविवारी पूल कोसळण्याच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

आरबीआयची स्वप्नपूर्ती, डिजिटल रुपया लाँच होणार, पहिल्या टप्प्यात ९ बँकांची निवड,यादी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here