मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशात लोकलशिवाय सार्वजनिक प्रवास हा विचारच अशक्य आहे. आपल्या सर्वांच्या रोजचा प्रवासाचा पहिला थांबा म्हणजे रेल्वे स्थानक. मुंबईतील बहुतांशी रेल्वे स्थानकांनी आपल्या आयुष्याची पन्नाशी ओलांडली आहेत. काहींनी शंभरी पार केली. दिवसागणिक प्रवासी वाढले. तुलनेने सुविधा मात्र वाढल्या नाहीत. सीएसएमटी ते कसारा/खोपोली/ पनवेल, चर्चगेट-विरार/डहाणू रोड, नेरुळ-खारकोपर, ठाणे-पनवेल या मार्गावर लोकलमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईतील लोकल स्थानकांचा आढावा घेणारी वृत्तमालिका रेल्वे स्थानकांची वहि ‘वाट’!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : ११,२०,८५० (सरासरी रोजचे प्रवासी)

ऐतिहासिक दर्जाचे स्थानक अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांसाठी एक प्रशस्त जागा नसावी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अहोरात्र प्रवासी वर्दळ असलेल्या या स्थानकात प्रवाशांसाठीच्या सुविधा तोकड्या आहे. यामुळे मेल-एक्स्प्रेससाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना जमिनीवर बसून रेल्वे गाड्यांची वाट पाहण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० मीटर अंतर फेरीवाला मुक्त करण्याच्या नियमाला सीएसएमटीमध्ये तिलांजली मिळत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील पहिले स्थानक असलेल्या सीएसएमटीमध्ये एकूण १८ फलाट आहेत. यात मेल-एक्सप्रेस फलाटाचाही समावेश आहे. यापैकी १ ते ८ क्रमांक या फलाटावरून लोकल वाहतूक होते. विशेष म्हणजे लोकल विलंबाने धावत असल्यास किंवा एखाद्या कारणामुळे लोकल रद्द झाल्यास प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था येथे उपलब्ध नाही. यामुळे प्रवासी खांबाभोवती बसून लोकलची वाट पाहतात. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रवासी उभे राहून वाट पाहण्यातच धन्यता मानत आहेत.

मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्रतीक्षागृह आहे. मात्र प्रवाशांच्या तुलनेत येथे आसन व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. प्रवासी जमिनीवर बसूनच मेल-एक्सप्रेसची वाट पाहतात. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्यासाठी व्यवस्था येथे उपलब्ध नाही. सभागृहाशेजारी कॅन्टीन आहे. या कॅन्टीनच्या शेजारी असलेल्या ड्रेनेजवर उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. भिकारी आणि फेरीवाल्यांचा मुक्त वावर असल्याने प्रवासी सुरक्षा रामभरोसे असल्याचे अधोरेखित होते

रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरात फेरीवाल्यांनी बसू नये, असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाचा आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणातही हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, याची अंमलबजावणी मध्य रेल्वेचे पहिले स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये झालेली दिसत नाही. अनेकदा ‘हद्दीचा’ मुद्दा उपस्थित करून रेल्वे महापालिकाकडे आणि महापालिका रेल्वेकडे बोट दाखवते. केंद्र आणि राज्य अशा यंत्रणांच्या कात्रीत सर्वसामान्य प्रवासी अडकतात.

एक स्वच्छतागृह आणि एक पाणपोई

फलाट क्रमांक १ वरील प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी फलाट क्रमांक ८ वर यावे लागते. आठ फलाटासाठी एकच स्वच्छतागृह असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांनी पिण्याचे पाणी विकत घ्यावे, असा आग्रह मध्य रेल्वेचा असावा. संपूर्ण स्थानकात फलाट क्रमांक १ वर एकमेव पाणपोई आहे. यामुळे ऐतिहासिक दर्जाचे स्थानकातील सुविधा याच आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

बाहेर पडण्याचा मार्ग बंद

मार्च २०१९ मध्ये हिमालय पूल कोसळल्यानंतर सीएसएमटी स्थानकातून मशीद दिशेने बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. यामुळे १२ किंवा १५ डब्यांच्या लोकलमधील मशिद स्थानकाच्या दिशेला उतरणाऱ्या प्रवाशांना पूल चढून फलाट क्रमांक १ वर उतरायचे आणि अर्धा फलाट चालून लहानशा गेटमधून बाहेर पडायचे किंवा संपूर्ण फलाट चालत मुख्य प्रवेशद्वाराजवळील सबवेच्या मार्गाने बाहेर पडायचे, असे पर्याय आहेत. लोकल आल्यावर येथे प्रचंड गर्दी होत असल्याने अप्रिय घटनेची धास्ती कायम आहे.

मोरबी प्रकरणी नऊ जण अटकेत; देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ओरेवा समूहाविरुद्ध गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here