मुंबई: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात समेट झाल्याचे दिसत असले तरी अद्याप हा वाद पूर्णपणे शमल्याचे दिसत नाही. रवी राणा (Ravi Rana) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या वादातून सपशेल माघार घेतली होती. मी बच्चू कडू यांनी ५० खोके घेतल्याचे वक्तव्य टीका करण्याच्या नादात केले होते. यामुळे बच्चू कडू (Bacchu Kadu) किंवा शिंदे गटाचे आमदार दुखावले गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे रवी राणा यांनी म्हटले होते. रवी राणा यांच्या माघारीनंतर बच्चू कडू आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करू, असे म्हटले होते. त्यानुसार आज बच्चू कडू यांच्याकड़ून अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

बच्चू कडू आज अमरावतीमध्ये मेळावा घेणार आहे. याठिकाणी ते कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका जाहीर करतील. मात्र, या सभेच्या ठिकाणी मैं झुकेगा नही’ असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसचे रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडू यांना वाद संपला का, अशी विचारणा करण्यात आली होती. तेव्हादेखील बच्चू कडू यांनी, नाही, अजून वाद संपला नाही. आमच्या संस्थापक सदस्यांशी मी उद्या चर्चा करणार आहे. आम्ही सर्व मुद्दे लिहून घेतले आहेत. उद्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून ते जिल्हा प्रमुखांसमोर मांडणार आहोत. त्यानंतर पुढे काय करायचं? हा निर्णय घेतला जाईल’, असे म्हटले होते. त्यामुळे आज बच्चू कडू नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Kadu Vs Rana: वर्षा बंगल्यावर अडीच तास खलबतं, बच्चू कडू-रवी राणा तलवारी म्यान करणार?

फडणवीसांकडून बच्चू कडूंची पाठराखण

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भविष्यात बच्चू कडू यांच्यावर असा आरोप कोणीही करूच शकणार नाहीत, याची पूर्णपणे तजवीज केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू हे गुवाहाटीला कसे गेले, याचा संपूर्ण घटनाक्रमक पत्रकार परिषदेत उलगडून सांगितला होता.

बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांनी मी स्वत: फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, आपल्याला सरकार बनवायचे आहे, तुम्ही सोबत हवे आहात. आमची इच्छा आहे की, तुम्ही आमच्या गटात यावं. माझ्या त्या एका फोन कॉलवरून बच्चू कडू हे गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे बच्चू कडू यांनी शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांबद्दल मला ठाऊक नाही, पण याचा अर्थ त्यांनी पैसे घेतलेत, असा होत नाही. पण बच्चू कडू हे माझ्या फोन कॉलवर गुवाहाटीला गेल्यामुळे मला त्यांच्याबाबत पूर्णपणे शाश्वती आहे.
तोडफोड करा आणि बाहेर पडा, कार्यकर्त्यांच्या भावना, मुख्यमंत्र्यांनी माझी बदनामी भरुन द्यावी : बच्चू कडू
त्यामुळे बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजी करुन शिंदे गटात केल्याचा आरोप करणे चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणामुळे आता भविष्यात रवी राणा किंवा अन्य कोणताही नेता ठरवलं तरी बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजीचा आरोप करु शकणार नाही. एकूणच रविवारी झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना बच्चू कडू यांची माफी मागायला लावली तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांची भक्कमपणे पाठराखण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here