महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज जयंती आहे. डॉक्टरांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. डॉक्टरांनी महाराष्ट्राच्या मातीत अंधश्रद्धेच्या वाढलेल्या पिकाचं निर्मूलन करण्याचा ध्यास घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलनासोबतचं ते मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी कार्यरत होते. सुरुवातीला कबड्डीपट्टू ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढाईचे प्रमुख शिलेदार असा त्यांचा प्रवास राहिला.सुरुवातीला समजावदी युवक दल, समता आंदोलन,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि १९८९ पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम केलं. हे सर्व सुरु असताना त्यांनी समविचारी पक्ष संघटनांसोबत सुसंवाद कायम ठेवला होता. महाराष्ट्राच्या महाराष्ट्र अंनिसचं काम करताना डॉक्टरांच्या सोबत अनेक तरुण जोडले गेले. डॉक्टरांची पुस्तक वाचून कार्यकर्ते बनले आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढाईचे शिलेदार बनले. सांगली जिल्हा अंनिसचे कार्याध्यक्ष म्हणून काम केलेले फारुख गवंडी यांनी देखील १९९२ पासून अगदी विद्यार्थी दशेत असल्यापासून नरेंद्र दाभोलकरांच्या कार्यानं आणि पुस्तकांतून प्रेरणा घेऊन गेली ३० वर्षांहून अधिक काळ हे काम सुरु ठेवलंय.

​मारेकऱ्यांनी डॉक्टरांची ती सवय हेरली

फारुख गंवडी त्यांच्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसोबच्या आठवणी सांगताना म्हणतात, मी अगदी विद्यार्थी दशेपासून या कामात जोडला गेलो. १९९२ पासून चळवळीत डॉक्टरांची पुस्तक वाचून आलो. अंनिस चळवळीत तेव्हापासून काम करत होतो. २००९ मध्ये सांगली जिल्ह्याचा अंनिसचा कार्याध्यक्ष झालो होतो. तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकर, सांगलीचे अध्यक्ष कुलकर्णी आणि मी सांगलीत संघटना बांधणीसाठी पाच दिवस फिरलो होतो, असं फारुख गवंडी म्हणतात.

डॉक्टरांसोबतचा तो ५ दिवसांचा सांगली जिल्हा दौरा होता, त्या वेळी सकाळी ते रात्री पाच दिवस दाभोलकरांच्या सोबत राहिलो. ते रात्री किती उशिरा कार्यक्रम संपला तरी पहाटे पाच वाजता ते उठायचे आणि फिरायला जायचे ते शेड्यूल कधी चुकलं नाही. त्यांचं टायमिंग, सकाळी उठणं फिरायला जाणं हे ते नेहमी करायचे मारेकऱ्यांनी सुद्धा हेच हेरलं होतं, असं फारुख गवंडी गंभीर आवाजात सांगतात.

​डॉक्टरांच्या विनोदी आणि मिश्कील स्वभावाचा अनुभव

सांगलीतील तासगावात जिल्हा दौऱ्याचा पहिला कार्यक्रम होता. डॉक्टरांचा मिश्कील स्वभाव त्यावेळी लक्षात आला, भाषण करताना ते नर्म विनोद करायचे. नर्म विनोदाची शैली त्यांच्या भाषणात होती. कुणीही दुखावलं जाणार नाही याची ते काळजी घ्यायचे. विरोधकांना देखील ते मोठ्या आवाजात बोलत नव्हते.

२००९ मध्ये शाळेच्या हॉलमध्ये कार्यक्रम, प्रचार प्रसार, व्हाटसअप नव्हतं, चांगलं नियोजन केलं, हॉल भरला होता, मी त्यावेळी प्रास्ताविक करताना डॉक्टर तुम्ही आल्यानं खूप लोकं जमलेली आहेत, असं आनंदानं सांगितलं. डॉक्टर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना सहकारी म्हणायचे, कितीही लहान असो की तरुण असो ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळतील माझा सहकारी असं ते म्हणायचे, असं फारुख गवंडी यांनी सांगितलं. त्यावेळी देखील डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले की, माझा सहकारी फारुख म्हणाला की मी इथं आल्यानं इतकी लोकं जमलीत, पण, इथं माझ्याच नावाचे महाराज आले असते तर शाळेच्या बाहेरील ग्राऊंड देखील कमी पडलं असतं. विरोधकांसाठी देखील अपमानास्पद शब्द वापरणं ते टाळायचे. श्रोत्यांना पहिल्यांदा समजलं नाही मग पुन्हा त्यांनी नरेंद्र महाराज सांगताच सभेतील वातावरण हलकं फुलकं झालं

​चळवळीच्या पैशांबाबत काटेकोर

चळवळीचे पैसे, चळवळीचा हिशोब देण्याबद्दल, काटेकोर वापराबद्दल ते आग्रही असायचे. ऑगस्ट २०१३ त्यांची हत्या झाली त्यापूर्वी जानेवारी २०१३ ला आम्ही त्यांचं मानसिक आरोग्यावर व्याख्यान घेतलेलं. मिरज मेडिकल, कॉलेजचे माजी विद्यार्थी होते त्या तिथं त्यांचं अध्यक्षीय भाषण होतं. त्यांनी जी तारीख दिली होती पुन्हा बदलली. डॉक्टरांनी दोन दिवस उशिरा येणार आहे, असं सांगितलं. पण तुम्हाला चुकून तारीख दिली होती, असं ते म्हणाले. कार्यक्रमाची तयारी असते, पत्रक छापणे, प्रसार करणे असतं. कार्यक्रमाची तारीख बदलण्याबाबतच्या मुद्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पत्रकांच्या छपाईचा खर्च देतो म्हणाले त्यांनी तो देऊ केला पण आम्ही घेतला नाही, असं फारुख गवंडी सांगतात. (नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्यासोबतच्या कार्यक्रमाची आठवण )

​डॉक्टरांचं ध्येय ठरलेलं

डॉक्टर नंतरच्या काळात स्वत: इंडिका गाडीनं फिरायचे. ते महाराष्ट्रभर एसटीनं फिरायचे. दाभोलकर कुटुंबीयांनी त्यांना नंतरच्या काळात खूप दग दग व्हायला लागली म्हणून इंडिका गाडी घेऊन दिली होती. डॉक्टरांचा खर्च शैलाताई दाभोलकरांच्या पगारातून केला जायचा. शाळेत कार्यक्रम, जाहीर लोकांच्यात कार्यक्रम आणि बैठक, अंनिसमध्ये जॉईन होण्याचं आवाहन, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसमोर मांडणी करायचे. पहिली ते चौथीच्या मुलांपासून मार्गदर्शन करण्यापासून सुरुवात,चमत्काराचे प्रयोग आणि दोन तीन गोष्टी सांगितल्या. पहिलीच्या मुलांना काय कळणार असा विचार न करता त्यांनी पाऊण तास विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं महत्त्व सांगितलं, अशी आठवण फारुख गवंडी यांनी सांगितली. (१९९८ मधील संत गाडगेबाबा प्रबोधन यात्रा…तासगाव)

​विरोधकांच्या जाळ्यात अडकायचं नाही

महिलांचं कॉलेज होतं, तिथं महिला प्राचार्या होत्या त्यांच्या मनात डॉक्टरांच्या कार्याबद्दल विशेष आपुलकी नव्हती. मात्र, तिथल्या एका स्टाफ मेंबरच्या विनंतीनं कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या महिला प्राचार्या कार्यक्रमाबद्दल नाखूष होत्या. डॉक्टर कार्यक्रमाला पोहोचल्यावर त्यांनी केबिनमध्ये चहाला बोलावलं, त्यांनी त्यांची बाजू जोरदारपणे मांडली, महिला प्राचार्यांनी अर्धातास अंनिसचं काम कसं चुकीचं आहे हे डॉक्टरांसमोर सांगण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्राचार्यांची इच्छा ही कार्यक्रम होऊ नये अशीच होती. केबिनमध्ये अर्धा तास मांडणी केल्यानंतर त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात अगोदर भाषण करणार म्हणाल्या, तिथं देखील त्यांनी तिच मांडणी पुन्हा केली, अंनिसच्या कामावर टीका केली. या अशा तापलेल्या वातावरणात डॉक्टर बोलायला उभे राहिले, त्यांनी वैज्ञानिक गोष्टींबाबत मार्गदर्शन केलं. गौतम बुद्धांच्या वाक्यांचा संदर्भ देत तुम्ही कुणी मोठ्या व्यक्तीनं मांडलं असलं तरी, धर्मग्रंथात मांडलं असलं तरी खरं मानू नका. तुम्हाला अनुभव आला तर खरं माना, असं म्हणत त्या प्राचार्यांची मांडणी एक दोन वाक्यात खोडून काढली. वैज्ञानिक दृष्टिकोनावर पुढं डॉक्टरांनी मांडणी डी.एड.,बी.एड च्या विद्यार्थिंनीसमोर केली. महिला विद्यार्थिनी अंनिसच्या कार्यकर्त्या होण्यास तयार झाल्या. यानंतर डॉक्टरांच्या पुस्तकांची देखील विक्री झाली.

​आपली रेष मोठी करायची

आपली रेष मोठी केली पाहिजे. आपण त्यांना खोडून काढत बसण्यापेक्षा, त्यांना काही का म्हणायचं असेल पण आपण ज्यासाठी गेलो होतो ते आपण साध्य करुन आलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकला तर तुमचं कधी सांगणार, तुमचं तुम्ही उभं केलं पाहिजे. त्यांना जे करायचं आहे ते करु देत आपण आपल्या पद्धतीनं त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाही. डॉक्टरांनी संयमानं त्या प्राचार्यांवर कसलिही कमेंट केली नाही. डॉक्टरांनी या प्रसंगात संयमाचं, अभ्यासाचं आणि अटीतटीचा प्रसंग वैचारिक दृष्ट्या कसा हाताळायचा शांत राहून हे त्यांनी दाखवून दिलं. ते म्हणाले मला त्या विद्यार्थिनींना शहाणं करायचं होतं. माझ्यासमोर तिनशे चारशे मुली बसलेल्या आहेत त्यांच्याकडून अपेक्षा होती. आपलं लक्ष्य ठरवून शांतपणे काम करायचं आहे हे त्यांना माहिती होतं, असं फारुख गवंडी म्हणतात.

​कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जायचे

भास्कर सदाखळेला अटॅक आला होता. तासगावचा तो पूर्णवेळ कार्यकर्ता होता. मी डॉक्टरांना त्याच्याबद्दल सांगताच ते पाच ते दहा हजार रुपये घेऊन आले. डॉ. विजय जाधव यांच्या दवाखान्यात अॅडमिट केलं होतं. डॉक्टरांनी विजय जाधव यांच्याशी चर्चा करुन माझ्या घरातला व्यक्ती आहे काळजी घ्या असं म्हटलं.

मदतीला येणं, संयम बाळगणं, चळवळीच्या ध्येय उद्दिष्ठासोबत काटेकोरपणे राहणं, शत्रूला पण अपमानित न करणं, पैशाचा काटेकोर नियोजन, स्वत:चा बडेजाव न करता चळवळीतील कार्यकर्त्यांना सहकारी माननं, डॉक्टरांचा दिवस पाचला सुरु व्हायचा, आम्ही दमायचो पण कितीही वाजता झोपले तरी सकाळी पाच वाजता उठायचे आणि थंड पाण्यानं अंघोळ करुन पुढच्या दौऱ्यासाठी निघायचे, अशी आठवण फारुख गवंडी यांनी सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here