औरंगाबाद : वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या २४ किलोमीटरच्या अखंड उड्डाणपुलासाठी आठ ठिकाणी रॅम्प केले जाणार आहेत. या आठ ठिकाणांहून नागरिकांना उड्डाणपुलावर चढता आणि उतरता येणार आहे. अखंड उड्डाणपुलासाठी सध्या अस्तित्वात असलेला सेव्हन हिल्स आणि मोंढा नाका येथील उड्डाणपूल मात्र पाडले जाणार आहेत.

औरंगाबाद शहरात येत्या काळात उभारला जाणारा अखंड उड्डाणपूल व मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात सोमवारी (३१ ऑक्टोबर) औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कार्यालयात वाहतुकीच्या सर्वसमावेशक आराखड्याचे सादरीकरण महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले. वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या अखंड उड्डाणपुलासाठी आठ ठिकाणी रॅम्पची व्यवस्था केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सादरीकरणाच्या वेळी स्पष्ट केले. शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या गेट क्रमांक एकपासून उड्डाणपुलाची सुरुवात होईल. केंब्रीज शाळा, विमानतळ, एसएफएस शाळा, महावीर चौक, एएस क्लब, कामगार चौक, वाळूज या ठिकाणी रॅम्प असणार आहेत. सिडको बसस्टँड चौकात आणखी एक रॅम्प तयार करण्याची सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अधिकाऱ्यांना केली.

Weather Forecast : लवकरच महाराष्ट्र गारठणार, पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
अखंड उड्डाणपूल तयार करताना सध्या अस्तित्वात असलेले उड्डाणपुल वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण त्यापैकी सेव्हन हिल्स आणि मोंढा नाका येथील उड्डाणपुल मात्र पाडले जातील असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. अखंड उड्डाणपूल छावणीच्या (लष्कराच्या) जागेतून जाणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने महावीर चौकातील उड्डाणपूल उभारण्यासाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या उड्डाणपुलाची दिशा बदलण्यात आली. त्याबद्दलही बैठकीत चर्चा झाली. मेजर मुळे यांनी आपली भूमिका मांडली, लष्कराच्या हद्दीत फार उंच पूल बांधता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतील चार किलोमीटरच्या रस्त्यावर उड्डाणपूल नसेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

उड्डाणपुल वाळूज गावापर्यंत असेल, असे सादरीकरणाच्या वेळी स्पष्ट करण्यात आले. डॉ. कराड यांनी त्यात दुरुस्ती सुचवली. उड्डाणपुल आणखी एक किलोमीटर पुढे नेऊन, बजाज कंपनीच्या पुढेपर्यंत पुलाचे बांधकाम करा, असे ते म्हणाले.

‘मेट्रो निओ’ सेवा दोन टप्प्यांमध्ये

‘मेट्रो निओ’ ही सेवा दोन फेजमध्ये उपलब्ध उभारण्याचा मनोदय या वेळी व्यक्त करण्यात आला. शेंद्रा औद्योगिक वसाहत ते क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन असा एक टप्पा असणार आहे, तर दुसरा टप्पा अहिल्याबाई होळकर पुतळा, महावीर चौक, मध्यवर्ती बसस्थानक, टाउन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, रोझ गार्डन, हिमायत बाग, हर्सूल टी पॉइंट, जळगाव रोड मार्गे सिडको बस स्टँड असा असणार आहे. ‘मेट्रो निओ’ साठी २२ स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे.

महावीर चौक पुलासाठी बैठक

महावीर चौकातील उड्डाणपुलाची उपयुक्तता तपासण्यासाठी, या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण तपासण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून बैठक घ्यावी. या बैठकीत उड्डाणपुलाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, असे डॉ. भागवत कराड यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या तुलनेने फारच कमी आहे, त्यामुळे हा उड्डाणपूल विनाकारण उभारण्यात आला, अशी चर्चा नेहमीच सुरु असते.

बार्बी डॉल लिमिटेड एडिशन, जॉर्ज बुश यांच्या लंचला नकार, प्रियांकाशी खटके; ऐश्वर्याचे हे किस्से तुम्हाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here