पूर्णा शहरातील विजयनगर येथे राहणाऱ्या अब्दुल करीम मस्तान यांचा सतरा वर्षीय मुलगा मोहम्मद कैफ हा तीन महिन्यापूर्वी हरवला आहे. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मस्तान कुटुंब हरवलेल्या मुलाचा शोध घेत आहे. असे असताना अचानक सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे अब्दुल करीम कुरेशी हे आपल्या कामानिमित्त सकाळी ८ वाजताच्या रेल्वे गाडीने नांदेडला गेले होते. त्यामुळे त्याची पत्नी मुमताज बेगम या आपल्या मुलांसोबत घरीच होत्या.
अचानक रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार महिला तोंडाला स्काफ बांधून अब्दुल करीम कुरेशी यांच्या घरी आल्या आणि त्यांच्या पत्नी मुमताज बेगम यांना म्हणाल्या की, तुझा हरविलेला मुलगा मोहम्मद कैफ बाहेर उभा आहे. तू लवकर आमच्या सोबत चल, असे म्हणून मुमताज बेगम यांना घरून घेऊन गेल्या.
अब्दुल करीम नांदेड येथून पूर्णा रेल्वेस्थानकावर येताच त्यांना मेहुण्याने फोन करून याची कल्पना दिली. तेव्हा ते धावत घराकडे येत असताना त्यांची मुले रस्त्यावर भेटली. आपल्या आईला कसा प्रकारे घरातून अज्ञात चार महिलानी घेऊन गेल्याची हकीकत त्यांनी आपल्या वडिलांना सांगितली.
या घडलेल्या प्रकारची कल्पना स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. परंतु आपली पत्नी मुमताज बेगम यांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने आपल्या पत्नीचा अज्ञात चार महिलानी अपहरण केल्याचे कळताच अब्दुल करीम कुरेशी यांनी दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी पूर्णा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
त्यानंतर अज्ञात चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहे. दरम्यान या घटनेमुळे परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.