अमरावती : अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. बंड करत गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारलाही निर्वाणीचा इशारा दिला आहे. ‘सत्ता गेली चुलीत, गेल्या २० वर्षांपासून ३५० गुन्हे अंगावर घेऊन मी महाराष्ट्रात फिरत आहे. बाकीचे नेते कार्यकर्त्यांना लढ म्हणतात, मात्र बच्चू कडू हा स्वत: लढतो. हा फरक माझ्यात आणि इतर नेत्यांमध्ये आहे. कोणीही येऊन काहीही बोलावं, हे चालणार नाही. पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. पण यापुढे कोणीही असला तरी मग प्रहारचा वार काय आहे हे दाखवून देऊ,’ असं आमदार कडू यांनी म्हटलं आहे.

‘आम्ही उगाच गुवाहाटीला नाही गेलो नाही. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३८ ला काँग्रेसला जळतं घर म्हटलं होतं. पण बाबासाहेबांचं तत्व महत्त्वाचं होतं. आपण ज्या वंचितांसाठी लढतोय त्यांच्यापर्यंत सत्ता नेता यावी म्हणून ज्या काँग्रेसला जळतं घर म्हटलं होतं त्या काँग्रेससोबत बाबासाहेब गेले आणि संविधान समितीचे सदस्य होऊन राज्यघटनेसारखी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांनी तुमच्या हाती दिली. निर्णय कडू असतात पण काम गोड करता आलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनीही किती वेळा शह केले, किती वेळा तह केले. पण तत्वाशी तडजोड केली नाही. राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करावं लागेल आणि तत्व तत्त्वाच्या पद्धतीने पाळावी लागतील. मात्र फक्त तत्वच धरून बसलो आणि इकडे काहीच ताकद लावली नाही तर त्या तत्त्वालाही काही किंमत राहणार नाही,’ अशा शब्दांत बच्चू कडू यांनी आपल्या बंडामागील भूमिका स्पष्ट केली आहे.

Jalna News: जालन्याच्या स्टील कंपनीत भीषण स्फोट, ८ ते १० कामगारांचा मृत्यू

‘आजचा मेळावा हा शक्तिप्रदर्शनाचा विषय नाही. आम्ही सैनिकासारखं जगतो. फार विचार करत नाही. गर्दीमध्ये दर्दी महत्त्वाची आहे. उगाच बच्चू कडू चार वेळा निवडून आलेला नाही. मागच्या काही वर्षांमध्ये मी महाराष्ट्राचा एकही कानाकोपरा सोडला नाही. आम्हाला सहन नाही झालं तर बुडून जाऊ पण कोणाला सोडणार नाही. आम्ही सत्तेला पाठिंबा दिला तर आमच्यावर खोक्यांचा आरोप केला. मात्र ज्याने कोणी आरोप केला तो विषय संपला आहे,’ असं म्हणत बच्चू कडू यांनी सध्या तरी रवी राणा यांच्यासोबत सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here