सातारा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:च्या शेताची पाहणी करुन स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. तसंच यंत्राद्वारे शेतातील पिकाची मशागतही केली. गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं उत्साहात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचा प्रश्न अनेक नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या उतेश्वर देवाचं दर्शन प्रचंड पावसामुळं झालं नव्हतं. मात्र आता या भागात पाऊस थांबल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ग्रामदैवताचं दर्शनही घेतलं आहे.