Nita Ambani Saree Draper Dolly Jain: दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, ईशा अंबानींसह अनेक सेलिब्रेटिंचं लग्न अतिशय शाही थाटात पार पडलं. यावेळी या सर्वांच्या लूकची, त्याच्या गाउन, साड्यांची तुफान चर्चा होती. या सेलिब्रिटींना त्यांच्या लग्नात किंवा इतर खास दिवशी कोण साडी नेसवत? ही महिला कोण आहे…या महिलेने ईशा अंबानी, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, सोनम कपूरसह अनेक अभिनेत्रींच्या लग्नात साडी किंवा लेहेंगा ड्रेप केला आहे. नीता अंबानीदेखील समारंभात याच महिलेकडून साडी नेसवून घेतात.

अंबानी कुटुंबाची साडी ड्रेपर

नीता अंबानी यांचं साडी ड्रेपिंग कोलकाताची प्रोफेशनल डॉली जैन करते. ईशा अंबानीपासून श्लोका मेहतापर्यंत साडी ड्रेपिंग डॉली करते. ईशा अंबानींच्या लग्नातही डॉलीनेच त्यांना साडी आणि लेहेंगा ड्रेप केला होता. अनिल अंबानींची पत्नी टीना अंबानींनाही समारंभासाठी डॉली साडी नेसवते. श्वेता मेहताचा लेहेंगाही डॉलीनेच ड्रेप केला होता. एक साडी नेसवण्यासाठी ती ३५ हजारांपासून लाखो रुपये घेते. मागील १५ वर्षांपासून ती महिलांना साडी नेसवण्याचं काम करते.
नाईलाजाने साडी नेसायला शिकली आणि तेच करिअर झालं

डॉलीचा एक साडी साडे अठरा सेकंदात नेसवण्याचा रेकॉर्ड आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तिच्या नावाची नोंद आहे. डॉली सब्यासाची मुखर्जी आणि मनिष मल्होत्रासारख्या पॉप्युलर डिझायनर्सच्या क्लाइंट्सला साडी नेसवते. डॉली बेंगळुरूमध्ये राहणारी आहे. लग्नाआधी डॉली जिन्स-टॉप घालत होती, पण लग्नानंतर तिला समजलं, की तिला सासरी जिन्स-टॉप घालण्याची परवानगी नाही. याच नाईलाजाने डॉली साडी कशी नेसायची हे शिकली.
३२५ प्रकारे साडी नेसण्याचा रेकॉर्ड

त्यानंतर साडी नेसणं आता शिकल्यानंतर ती स्टाइल करणंही गरजेचं असल्याचं तिला वाटू लागलं. त्यानंतर तिने वेगवेगळ्या प्रकारे साडी ड्रेपिंग शिकणं सुरू केलं. याचं श्रेय ती तिच्या सासरच्या मंडळींना देते. लग्नानंतर जर सासरी तिला जिन्स-टॉपची परवानगी असती, तर आज ती यात कधीही इतकं मोठं करिअर करू शकली नसती, असं ती म्हणते. लिम्बा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचा ३२५ प्रकारे साडी नेसण्याचा रेकॉर्ड आहे.
डॉलीचा कोलकाता ते मुंबई प्रवास

कोलकाता ते मुंबईपर्यंतचा प्रवास करणाऱ्या डॉलीने पहिल्यांदा प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अबू जानी-संदीप खोसलाचा डिझाइन केलेला लेहेंगा एका नववधूला ड्रेप केला होता. आपल्या प्रोफेशनमध्ये इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचलेली डॉली या यशाचं श्रेय सासरच्या लोकांना आणि अबू जानी-संदीप खोसलाला देते. या दोघांनी तिला अनेक मोठ्या संधी दिल्याचं ती सांगते.
श्रीदेवी यांना पहिल्यांदा नेसवली साडी

डॉली अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील आहे. साडी नेसायला येऊ लागल्यानंतर ती आजू-बाजूच्या महिलांना त्यांच्या खास कार्यक्रमात साडी नेसवत होती. डॉलीने पहिल्यांदा श्रीदेवी यांना साडी नेसवली होती. साडी नेसवल्यानंतर श्रीदेवी यांनी डॉलीला तुझ्या बोटांमध्ये जादू आहे असं म्हटलं. श्रीदेवींच्या या शब्दाने ती भारावून गेली आणि इतक्या मोठ्या कलाकाराने आपलं कौतुक केलं म्हणजे खरंच काही तरी आहे असं तिला वाटू लागलं आणि आता काहीतरी वेगळं करू असं ठरवलं.