नांदेड : जिल्ह्यातील बोधडी येथील भाविक तेलंगणातील आडेली देवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात किनवट तालुक्यातील शिवणीपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या झळकवाडी गावाजवळील घाटात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.एस. शेख आणि संदीप साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.