पुणे : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक उद्योग इतर राज्यांमध्ये गेल्याच्या आरोपांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचे पडसाद पुणे शहरातही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. पुण्यात ठाकरे आणि शिंदे गटाच्या युवासेनेकडून एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

शिंदे गटाकडून ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा तोटा’ अशा आशयाचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत पुण्यातील बालगंधर्व चौकात बॅनर्स लावले होते. यालाच उत्तर देत ठाकरे गटाकडून देखील बाजीराव रस्त्यावर बॅनर लावत शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेण्यात आला आहे. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांमध्ये नव्हता मिळत वाटा म्हणून गद्दारांनीच केलाय महाराष्ट्राच्या तरुणाईचा घाटा, असे बॅनर ठाकरे गटाच्या युवासेनेकडून लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात येणारा टाटा एअर बस प्रकल्प, त्याचबरोबर वेदांता-फॉक्स्कॉन, मेडिकल डिवाइस, बल्क ड्रग पार्क असे अनेक उद्योग जे महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होते, परंतु नवीन सरकार आल्यानंतर हे सर्व उद्योग प्रामुख्याने गुजरात राज्यामध्ये जास्त प्रमाणात गेले. त्यामुळे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील तरुणांचं फार मोठं नुकसान झालं आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रभर फिरून करत आहेत. त्यानंतर आता ठाकरेंची युवासेनाही सरकारविरोधात आक्रमक झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गवर ज्वालाग्राही एलपीजीवाहक टँकर उलटला; एकदिशा मार्ग तूर्तास सुरू; तज्ज्ञांची टिम आल्यावर वाहतुक पुन्हा थांबवणार

‘इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर मुंबई हे अहमदाबाद गुजरात या ठिकाणी गेले. वेदांता-फॉक्सकॉनचा पुणे शहरात प्रकल्प होणार होता. तो गुजरातमधील धोलोरा या ठिकाणी आता होणार आहे. मरीन अकॅडमी पालघर येथे होणार होती. ते आता द्वारका या ठिकाणी गुजरात राज्यात होणार आहे. ड्रग पार्क हे रायगडमध्ये होणार होतं. ते आता गुजरातमधील भरूच या ठिकाणी गेलेलं आहे. मेडिकल डिव्हाईस पार्क हे संभाजीनगर येथे होणार होते. ते हिमाचल प्रदेशमध्ये गेलेला आहे आणि टाटा एअर बसचा नागपूरमधील प्रकल्प आता गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहे,’ असं ठाकरे गटाकडून पुण्यात लावलेल्या बॅनरवर लिहिलं आहे.

दरम्यान, या सर्व बॅनरबाजीवरून पुण्यात शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले असून आगामी काळात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here