महापालिकेने ऑगस्ट २०२२ मध्ये ५ हजार ८०६ कोटींच्या निविदा मागवल्या होत्या. या पाच निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने निविदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामांसाठी आता पुन्हा नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यापूर्वी निविदांच्या अटी व शर्तींचे पुनर्विलोकन करण्यात येईल, तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता जलदगतीने कामे करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे या दृष्टीने निर्णय घेऊन नवीन निविदा मागविणे संयुक्तिक ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा व मुंबईतील रस्ते एक वर्षात खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने पालिकेने सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी एकूण पाच निविदा २ ऑगस्ट २०२२ रोजी मागवल्या होत्या. यामध्ये शहर १, पूर्व उपनगरे १ आणि पश्चिम उपनगरे ३ अशा एकूण पाच निविदांचा समावेश होता. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता व दर्जा उत्तम राखण्यासाठी या निविदांमध्ये मोठ्या नामांकित कंपन्या समाविष्ट होण्यासाठी निविदा प्रक्रियेत कठोर अटी व शर्ती समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रथमच प्रिकास्ट पर्जन्यवाहिन्या व उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी भूमिगत प्रिकास्ट डक्ट व प्रिकास्ट मॅनहोल तसेच इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून नवीन निविदा तातडीने मागविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. प्रिकास्ट पर्जन्य जलवाहिन्या, प्रिकास्ट डक्ट व प्रिकास्ट मॅनहोल यांचा अंतर्भाव केल्याने कामाची गुणवत्ता सुधारण्यास आणखी मदत होणार आहे. कामासाठी लागणाऱ्या वेळेची अधिक बचत होऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. या सर्व कारणांनी नवीन निविदा मागविणे संयुक्तिक ठरणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा टी-शर्टमधला कूल डूड अंदाज; बीझी शेड्युलमधून गावाला भेट, शेतातील काम करण्यात शिंदे रमले