दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यासही वाव आहे कारण आता किरकोळ विक्रेत्यांचे मार्जिन सकारात्मक झाले आहे. अहवालानुसार किरकोळ विक्रेत्यांचे मार्जिन पेट्रोलवर प्रति लिटर ६ रुपयांनी सकारात्मक झाले आहे. लवकरच डिझेलवरील १० रुपयांची अंडर रिकव्हरी कमी होईल, असे अपेक्षित आहे. गेल्या सात महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, २२ मेपासून सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८ आणि ६ रुपयांनी स्वस्त झाले होते.
आज पेट्रोल-डिझेलचे दर
दुसरीकडे, तेलाच्या किमती घसरल्याच्या वृत्तादरम्यान २ नोव्हेंबर रोजी देशात आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. iocl.com या अधिकृत वेबसाइटच्या ताज्या अपडेटनुसार, आज, २ नोव्हेंबर (बुधवार) तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ताज्या अपडेटनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.
१ नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ४० पैशांनी कपात अपेक्षित होती, मात्र भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
मे महिन्यात अखेरचे बदल
गेल्या अनेक दिवसांपासून देशात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होऊनही भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेलाच्या किंमतीतील शेवटचा बदल २२ मे रोजी झाला होता. अशा परिस्थितीत पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारने २२ मे रोजी उत्पादन शुल्क कमी करत देशभरातील नागरिकांना दिलासा दिला होता.