मोरबी: गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल रविवारी कोसळला. या दुर्घटनेत १३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची विचारपूस केली. मोदींच्या भेटीआधी रातोरात रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यात आला. मोदींच्या भेटीचे फोटो समोर आले. त्यात सर्वाधिक चर्चा बेड नंबर १२६ ची झाली.

राष्ट्रीय जनता दलानं तीन फोटो ट्विट केले आहेत. तिन्ही बेड नंबर १२६ चे आहेत. बेड नंबर १२६ ची कहाणी काय आहे, असा प्रश्न राष्ट्रीय जनता दलानं ट्विट करून विचारला. तीन फोटोंपैकी दोनमध्ये एकच व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीच्या पायाला ३१ ऑक्टोबरला लहान पट्टी होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबरला मोठी पट्टी बांधण्यात आली. याच दिवशी पंतप्रधान मोदींनी त्याची विचारपूस केली.

पंतप्रधान मोदींच्या भेटीआधी पट्टी मोठी कशी काय झाली, असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. या व्यक्तीचं नाव अश्विन आहे. ‘पहिली लहान पट्टी बांधण्यात आली होती. ती कच्ची पट्टी होती. त्यानंतर एक्सरे काढण्यात आला. पायाला फ्रॅक्टर असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर प्लास्टर बांधण्यात आलं,’ असं अश्विन यांनी सांगितलं.

बेड नंबर १२६ ची काय भानगड आहे, असा प्रश्न अश्विन यांना विचारण्यात आला. त्यावर मी आधी १२५ नंबर बेडवर होतो. माझ्या बाजूच्या बेडवर एक महिला होती. तिला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर मला १२६ नंबरच्या बेडवर शिफ्ट करण्यात आलं, असं उत्तर अश्विन यांनी दिलं.
पुलाची दुरुस्ती केलीच नाही, १३५ जणांचा जीव गेल्यानंतर मॅनेजर म्हणतो, ‘ही तर देवाची इच्छा…’
मोरबी सिव्हिल रुग्णालय सध्या चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यात आला. साफसफाई करण्यात आली. रंगकाम करण्यात आलं. नवे बेड, नवे वॉटर कूलर लावण्यात आले. यावरुन रुग्णालय प्रशासनावर टीका झाली. विशेष म्हणजे कूलर इतके घाईघाईत आणण्यात आले की ते ठेवण्यात आल्यानंतर बराच वेळ त्याच्यातून पाणीच येत नव्हतं. याची बरीच चर्चा झाली. त्यानंतर कूलरमधून पाणी येऊ लागलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here