यावेळी भाषणात गुलाबराव देवकर यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडून गुलाबराव पाटील यांना विकासकामांबाबत आव्हानही दिले. याबाबत गुलाबराव देवकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी असल्याने शिवसेनेच्या सभेला उपस्थित राहिलो. विधानसभेसाठी मी स्पर्धेत आहे, मात्र महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील, त्याला निवडून आणू,’ असं देवकरांनी सांगितलं आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे उमेदवार होते. आता ते शिंदे गटात गेल्याने त्यांच्याविरोधात विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेचा उद्धव ठाकरे गट हे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांच्याकडूनही विधानसभेची तयारी सुरू आहे. याबाबत गुलाबराव वाघ यांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असल्याने त्यांना आमंत्रण दिले होते, त्यामुळे ते मेळाव्याला आले. उमेदवारीबाबत पक्ष जे ठरवेल, त्यानुसार आदेशाचे पालन करू, इच्छुक कोणीही असू शकतो, एकाच पक्षांमध्येही दोन-दोन, तीन-तीन जण इच्छूक असू शकतात. त्यामुळे हा तर वेगवेगळ्या पक्षांचा विषय आहे,’ असं म्हणत गुलाबराव वाघ यांनी अप्रत्यक्षरित्या आपणही मैदानात असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे दोन्ही उमेदवार सक्रिय झाले असले तरी संधी राष्ट्रवादीच्या गुलाबरावांना मिळते, की, उद्धव ठाकरे गटाच्या गुलाबराव वाघांना मिळते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. मात्र सध्यातरी जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गट हे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.