बांग्लादेशचा सलामीवीर लिंटन दासनं भारताविरुद्ध फलंदाजी करताना अक्षरश: दांडपट्टा चालवला. दास २६ चेंडूंवर ५९ धावा काढून नाबाद आहे. यामध्ये त्यानं ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले आहेत. त्याच्या साथीला नजमुल शांतो आहे. दासच्या तुलनेत शांतोची फलंदाजी शांत आहे. तो १६ चेंडूंत ७ धावा काढून नाबाद आहे.
लिंटनच्या आक्रमक फलंदाजीमुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांग्लादेशचा संघ पुढे आहे. बांग्लादेशचा संघ सध्या १७ धावांनी पुढे आहे. पावसाचा अंदाज घेऊन दासनं सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. त्याचा फायदा बांग्लादेशला होताना दिसत आहे.
डकवर्थ लुईस नियम काय सांगतो?
सामन्यात पावसाचा अडथळा आल्यास डकवर्थ लुईस नियम लागू होतो. अशा परिस्थितीत पाठलाग करणाऱ्या संघानं कमी विकेट्स गमावल्या असल्यास त्यांना फायदा मिळतो. ७ षटकांनंतर सामना थांबला आहे. बांग्लादेशनं एकही विकेट गमावलेली नाही. २० षटकांत १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ७ षटकांनंर विकेट गेली नसल्यास डकवर्थ लुईसनुसार आघाडीवर राहण्यासाठी संघाच्या ४९ धावा झालेल्या हव्यात. बांग्लादेशच्या सध्या ६६ धावा झाल्या आहेत. त्यामुळे ते १७ धावांनी पुढे आहेत.