ऍडलेड: टी-२० वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा थरार पाहायला मिळाला. बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतानं अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जिंकला. बांग्लादेशचा सलामीवर लिटन दासनं संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. पावसामुळे सामना ७ षटकांनंतर थांबला. त्यावेळी बांग्लादेश १७ धावांनी पुढे होता. डकवर्थ लुईसनुसार बांग्लादेशकडे आघाडी होती. त्यात आक्रमक खेळणारा दास अर्धशतक साजरं करून नाबाद होता.

दासनं मैदानात येताच बॅटरुपी दांडपट्टा फिरवायला घेतला. अवघ्या २१ चेंडूंत त्यानं अर्धशतक साजरं केलं. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सहज धावा निघत होत्या. दासची फटकेबाजी पाहता सामना एकतर्फी होतो की काय अशी भीती वाटू लागली. मात्र तितक्यात पावसाला सुरुवात झाली. जवळपास ४५ मिनिटं वरुणराजा बरसला. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला.
सिंग इज किंग… अर्शदीप सिंगने सामना फिरवला, भारतीय संघ हरता हरता सामना जिंकला…
सर्व खेळाडू मैदानाबाहेर होते. भारतीय संघ डकवर्थ लुईसनुसार पिछाडीवर होता. त्यामुळे भारतीय चाहते पाऊस थांबावा यासाठी प्रार्थना करत होते. अखेर ४५ मिनिटांनी खेळ सुरू झाला. सामना २० षटकांऐवजी १६ षटकांचा करण्यात आला. बांग्लादेशसमोरचं आव्हान १८५ वरुन १५१ धावांवर आलं. ७ षटकांत बिनबाद ६६ अशी धमाकेदार सुरुवात करणाऱ्या बांग्लादेशला पुढच्या ९ षटकांत ८५ धावांची गरज होती.

बांग्लादेश सामना जिंकणार असं वाटत असताना ८ व्या षटकात बाद झाला. पावसानंतर सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूंवर दास धावबाद झाला. राहुलच्या अचूक थ्रोनं दासला बाद केलं. इथून सामना फिरण्यास सुरुवात झाली. पावसामुळे बांग्लादेशची लय बिघडली. ४५ मिनिटांचा ब्रेक बांग्लादेशसाठी अडथळा ठरला आणि इथूनच सामना फिरला.
अंपायरला भिडणाऱ्या शाकिबला विराटने रोखलं, नो-बॉलवर पाहा काय गोंधळ झाला Video
दास बाद झाल्यानंतर सलामीवीर शांतोनं काही चांगले फटके लगावले. मात्र १० व्या षटकात तो बाद झाला. यानंतर ठराविक अंतरानं बांग्लादेशचे फलंदाज बाद होत राहिले आणि १३ व्या षटकात बांग्लादेशची अवस्था ६ बाद १०८ अशी झाली. यानंतरही नुरुल हसन आणि टस्कीन अहमदनं फटकेबाजी करत बांग्लादेशचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न तोकडा पडला. बांग्लादेशचा संघ ५ धावांनी पराभूत झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here