ravi rana news, राणांनी वाद पुन्हा भडकवला; बच्चू कडू म्हणतात, घरी या, मी तलवारीचा वारही झेलेन! – prahar leader bachchu kadu open challenge to mla ravi rana who made controversial statement
अमरावती : अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडल्याची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. बच्चू कडू यांनी काल समर्थकांचा मेळावा घेत पुन्हा वैयक्तिक आरोप केल्यास कोथळा बाहेर काढू, असा इशारा दिल्यानंतर आज रवी राणांनीही आक्रमक वक्तव्य केलं. बच्चू कडू पुन्हा आमदार कसा होणार ते पाहा, असं आव्हान राणा यांनी दिल्यानंतर हा वाद पुन्हा चिघळला आहे. रवी राणांच्या आव्हानाचा आता बच्चू कडू यांनीही जोरदार समाचार घेतला आहे.
‘घरात घुसून मारू, निवडणुकीत पाडू, असं आव्हान रवी राणा यांनी दिल्याचं मी मीडियावर पाहिलं. रवी राणा यांना मला मारायचं असेल तर मी ५ तारखेला घरी आहे. तेव्हा त्यांनी तलवार घेऊन माझ्या घरी यावं. मी मार खायला तयार आहे. मी राणा यांच्या तलवारीचा वार छातीवर झेलेन,’ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. एकीकडे राणा यांना आव्हान देत असताना बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना मात्र शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या पोहरादेवीच्या दर्शनाचं महत्त्व काय? एकाच दौऱ्यात ठाकरे तीन मुद्दे निकाली काढणार
‘मला आता हा वाद वाढवायचा नाही. कारण या वादात शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न मागे पडत आहेत. आता आपण यामध्ये अडकून पडलो तर हे प्रश्न मागे राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. माझ्या बाजूने वाद संपला आहे. मात्र तरीही राणा यांना माझ्यावर हल्ला करायचा असेल तर त्यांनी माझ्या घरी यावं. मी माझं रक्त वाहून द्यायला तयार आहे,’ असं बच्चू कडू म्हणाले.
सत्ताधारी पक्षांना पाठिंबा दिलेले रवी राणा आणि बच्चू कडू हे दोन आमदार आमने-सामने आल्याने या वादात थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मध्यस्थी केली होती. या दोन्ही आमदारांना मुंबईत बोलावून घेत शिंदे-फडणवीसांनी वाद मिटवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र या बैठकीला काही तास उलटताच पुन्हा एकदा राणा-बच्चू कडू वाद चिघळल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मध्यस्थी अपयशी ठरली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, राज्यातील दोन आमदारांमध्ये सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आगामी काळात नेमकं कोणतं वळण घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.