मुंबई : यंदा राज्य सरकारने दिवाळी निर्बंधमुक्त केल्याने राज्यभरातील नागरिकांनी आपल्या आप्तेष्टांसह हा सण साजरा केला. दिवाळीत प्रवासासाठी हंगामी दरवाढ केल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांनी लालपरीवर विश्वास दाखवला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात दिवाळीसाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमधून सुमारे ४ कोटी ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. या ११ दिवसांत एसटीला सुमारे २७५ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले असून संपूर्ण महिनाभरात एसटी महामंडळाने ६४२ कोटी रूपयांच्या महसूलाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी एसटीने ५६ लाख किमीचा प्रवास करत एकाच दिवशी ३१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवलं आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि दिवाळीचा सण पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात नियमित बसफेऱ्यांबरोबरच ‘दिवाळी स्पेशल’ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काळात दरवर्षी प्रवासी दरात १० टक्के हंगामी दरवाढ केली जाते. या दरवाढीनंतरही प्रवाशांनी आपल्या लालपरीवर म्हणजेच एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. या नागरिकांनी एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाड्यांचा लाभ घेत आपल्या इच्छितस्थळी प्रवास केला. २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सोडलेल्या जादा गाड्यांद्वारे ४ कोटी ९५ लाख प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या माध्यमातून २७५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

परतीच्या पावसातील शेतीची नुकसानभरपाई निकषांच्या दुप्पटीनं देणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ज्येष्ठ नागरिकांनीही घेतला लाभ

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरीकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरीक’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येतो. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील २६ लाख ५५ हजार १३८ नागरिकांनी प्रवास करत सेवेचा लाभ घेतला आहे. तसंच संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात ८० लाख ३८ हजार ९१ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here