पोलीस निरीक्षक पदावर असताना मयत झाले होते; त्यांचे कुटुंबीयाचे हाल सुरू होते
तक्रारदार हे पोलीस अधिकाऱ्याचे चिरंजीव आहेत. गेल्या वर्षी तक्रारदार यांचे वडील पोलीस निरीक्षक या पदावर असताना अकस्मात मयत झाले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य फॅमिली पेंशनसाठी कोषागार कार्यालयात हेलपाटे मारत होते. कोषागार कार्यालयातील अश्विनी बडवणे (ज्युनिअर अकाऊंटंट/लिपिक) या फॅमिली पेंशनची फाईल पुढे सरकवण्यासाठी ६ हजार रुपये लाच मागत होत्या. मयत पोलीसांच्या कुटुंबीयाने हताश होऊन १५०० रुपये म्हणून पहिला हफ्ता देखील दिला होता. पण राहिलेले ४५०० रुपयांसाठी अश्विनी बडवणे यांनी तगादा लावला होता.
साडेचार हजार रुपये स्वीकारताना कारवाई
तक्रारदार पोलीस कुटुंबीयाने याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात येऊन तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा लावला. साडेचार हजार रुपयांची लाच घेताना अश्विनी बडवणे या महिला लिपिकास रंगेहात पकडले. या कारवाईत अँटी करप्शनचे मुख्य अधिकारी गणेश कुंभार यांचा सहभाग होता. एकच दिवसांपूर्वी गणेश कुंभार यांनी उपअधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली होती.
अधिक माहिती देताना गणेश कुंभार यांनी सांगितले की, कोषागार कार्यालयात निवृत्त सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची सरकारी कामे असतात. या ठिकाणी नेहमीच पैशांची मागणी केली जाते. आता या कारवाईमुळे कोषागार कार्यालयातील सरकारी कामे लवकर पुढे सरकतील.