नागपूर : मस्कतहून बँकॉकला निघालेल्या ओमान एअरच्या फ्लाइट नंबर डब्ल्यू वाय ०८१५ या विमानातील नाझी सुलेमान अब्दुल्लाह (वय ४५) या ओमानी नागरिकाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाले. तब्बल ४ तासानंतर विमानाने उड्डाण भरले तर रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुढील दोन दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती किम्स किंग्जवे हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक (कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी दिली. रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेत सायंकाळी ५ वाजतादरम्यान विमान बँकॉकच्या दिशेने उडाले. यामध्ये एकूण २९० प्रवासी होते.