मुंबई (समर खडस) : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रथमच धनुष्यबाण चिन्हाऐवजी ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर लढत आहे. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने आता निव्वळ औपचारिकता उरली असली तरी नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी लटके यांच्यासमोर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार नसला तरी भाजपचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार चालवल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे.

नाशिकमधील ‘त्या’ खुनाचे गूढ १२ तासांत उकलले; आरोपीला पाहताच कुटुंबीयांना फुटला घाम
दरम्यान, आज अंधेरी पूर्व मतदारसंघात ३८ मतदान केंद्रावर मतदान होईल. मतदानासाठी एकूण दोन लाख ७१ हजार ५०२ मतदार पात्र आहेत. मतदान पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावे म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होऊन निकाल घोषित केला जाईल.

हे उमेदवार रिंगणात

ऋतुजा लटके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी, पीपल्स), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पार्टी), नीना खेडेकर (अपक्ष), फरहाना सिराज सय्यद (अपक्ष), मिलिंद कांबळे (अपक्ष) आणि राजेश त्रिपाठी ( अपक्ष).

अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावे, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

प्रकल्प खर्चात दुप्पट वाढ; ऐरोली-काटई नाका महामार्ग प्रकल्प रखडल्याचा परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here