करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आयुष मंत्रालयाने रोग प्रतिबंधकारक शक्ती वाढविण्यावर जास्त भर दिला आहे. त्यानुसार आर्सेनिक अल्बम -३० हे होमिओपॅथी औषध वापरण्याची नागरिकांना शिफारस केली आहे. त्यानुसार शहरी भागात महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत औषध पुरवठा करण्यात येत आहे. पाच कोटी जनतेसाठी हे औषध राज्य सरकारच्या वतीने मोफत देण्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी केली. त्यानुसार औषधांचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रकिया राबवण्यात आली. या निविदेतील दर जास्त असल्याने स्थानिक पातळीवर खरेदी करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना देण्यात आले. यानुसार जिल्हा परिषदांनी त्याची खरेदी केली.
बाजारात दोन रूपये दराने मिळणारे हे औषध २३ रूपयांना घेतल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केला. ग्रामविकास खात्यावर झालेल्या या आरोपानंतर मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. हा आरोप दिशाभूल करणारा असल्याने चोवीस तासांत माफी मागा अन्यथा बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला. पण अजूनही पाटील यांनी दिलगिरी व्यक्त न केल्याने मुश्रीफ यांनी त्यांना पुन्हा एक पत्र पाठवले आहे. दोन रूपये दराने जर हे औषध मिळणार असेल तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याशी संपर्क साधतील, त्यांना सहकार्य करावे असे, आवाहन त्यांनी या पत्रात केले आहे.
मुश्रीफ यांच्या या पत्राने या दोन्ही नेत्यांत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी देखील पाटील यांनी केलेल्या एका आरोपाबाबत मुश्रीफ यांनी त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल केला आहे. माफी न मागितल्यास दुसरा दावा ठोकण्याचा इशारा दिल्याने याबाबत पाटील काय प्रत्यूत्तर देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times