अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली होती. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून (ठाकरे गट) करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. आता या पोटनिवडणुकीत अगोदरच अवघे ३१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये आता नोटाला किती मतं पडणार, हे पाहणे औत्स्युकाचे असेल. मुरजी पटेल यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊनही मतदान केले होते. त्यामुळे त्यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी नोटा की अपक्ष यापैकी नक्की कोणाची निवड केली असावी, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पोटनिवडणुकीत अवघ्या ८५,६९८ नागरिकांनी मतदान केल्याने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना निर्भेळ विजय मिळाल्याचे दाखवायचे असल्यास मोठ्या मताधिक्याने निवडून यावे लागेल. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढवली होती. अंधेरी पूर्व भागातील शिवसेनेची पारंपरिक व्होटबँक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांचा टक्का लक्षात घेता ऋतुजा लटके यांना ४५ ते ५० हजार इतकी मतं पडतील, अशी अपेक्षा आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं ऋतुजा लटके यांच्याकडे ट्रान्सफर होणार का, हे पाहावे लागले. तसे घडले तरच ऋतुजा लटके यांना निर्भेळ यश आणि दणदणीत विजय मिळवता येणे शक्य आहे. या सगळ्यात ठाकरे गटाने दावा केलेला नोटा फॅक्टरही निर्णायक ठरू शकतो. तसेच मतदारसंघातील कोणत्या प्रभागांमधून ऋतुजा लटके यांना आघाडी मिळणार, हा फॅक्टरही आगामी महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने निर्णायक ठरेल. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मतदानाचा पॅटर्न नेमका कसा होता?
अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले. मतदान पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदानाची नोंद झाली, अशी माहिती पाटील यांनी दिली.
या २५६ मतदानकेंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथील मतदानकेंद्र ५३ मध्ये सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदानकेंद्रांमध्ये एकूण १,४१८ मतदारांपैकी ७२६ महिला मतदार असल्याने या ठिकाणीच सखी मतदानकेंद्र तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारणपणे १,६०० अधिकारी, कर्मचारी, ११०० मुंबई पोलिस व इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित होते. या व्यतिरिक्त ७० सूक्ष्म निरीक्षकही होते. येत्या रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.