२०१८, नोव्हेंबरचा महिना…एक लिटर सोयाबीनच्या तेलाचा भाव ९९ रुपये होता. मात्र, आता एक लिटर सोयाबीन तेलाची किंमत आहे १६५ रुपये. याचा अर्थ गेल्या चार वर्षांमध्ये सोयाबीन तेलाच्या किमतीत ६६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याप्रमाणे एक किलो तुरीची डाळ चार वर्षांत ८३ रुपयांवरून ११८ रुपयांवर गेली आहे. आकडेवारीवर नजर टाकली असता, किरकोळ महागाई चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढली आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये महागाईचा दर ३.३ टक्के होता, तो आता जवळपास ७ टक्क्यांच्या आसपास आहे. गेल्या नऊ महिन्यांत चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादेच्या वरच असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर बँक महागाईवर नियंत्रण मिळत नसल्याच्या कारणांचा पाढा केंद्र सरकारसमोर वाचणार आहे.

चार वर्षांतील वस्तूंच्या वाढत्या किमती

गव्हाचं पीठ – १ नोव्हेंबर २०१८ रोजी २७ रुपये किलो, १ नोव्हेंबर २०२० रोजी २४ रुपये किलो, १ नोव्हेंबर २०२१ मध्ये ३० रुपये किलो.

सोयाबीन तेल – १ नोव्हेंबर २०१८ मध्ये ९९ रुपये लीटर, १ नोव्हेंबर २०२० रोजी १२२ रुपये लीटर, तर मागील नोव्हेंबर २०२१ रोजी १६५ रुपये किलो इतकी आहे.

तांदूळ – १ नोव्हेंबर २०१८ मध्ये ३५ रुपये किलो, २०२० मध्येही ३५ रुपये किलो आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये ३३ रुपये किलो.

साखर, दूध, डाळीच्या दरात वाढ

साखर – २०१८ मध्ये ३९ रुपये किलो, २०२० मध्ये ३८ रुपये किलो, तर २०२२ मध्ये ४१ रुपये किलो इतकी झाली.

दूध – १ नोव्हेंबर २०१८ रोजी ४२ रुपये लिटर, २०२० मध्ये ४६ रुपये लीटर, तर २०२१ मध्ये ५२ रुपये लीटरवर दुधाचे दर पोहोचले.

तुरीची डाळ – २०१८ मध्ये तुरीची डाळ ८३ रुपये किलो होती. त्यानंतर २०२० मध्ये ११८ रुपये, तर २०२१ मध्येही ११८ रुपये दर होते.

पेट्रोलच्या दरांचा भडका, स्वयंपाकाचा गॅसही महागला

इंडियन ऑइल कॉर्पोरेशननुसार, दिल्लीत इंधनाचे दर २०१८ मध्ये पेट्रोल ७९.३७ रुपये प्रति लीटर होतं. त्यानंतर २०१९ मध्ये ७२.८६ रुपये प्रति लीटर, तर २०२० मध्ये ८१.०६ रुपयांवर पोहोचलं. २०२१ मध्ये हाच दर थेट १०९.६९ वर पोहोचला. २०२२ मध्ये पेट्रोल दर काहीसा कमी झाला असून ९६.७२ रुपये प्रति लीटर इतका आहे.

२०१८ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दिल्लीतील दर ९३९ रुपये होता. २०१९ मध्ये ६८१.५० रुपये, २०२० मध्ये ५९४ रुपये, त्यानंतर २०२१ मध्ये थेट गॅस सिलेंडर ८९९.५० रुपयांवर पोहोचला. २०२२ मध्ये हाच दर १०५३ इतका झाला.

किरकोळ महागाई दीडपटीने वाढली, सहा टक्क्यांच्या वर

२०१७-१८ मध्ये महागाईचा दर ३.३ टक्के होता. २०१८-१९ मध्ये ३.४ टक्के, २०१९-२० मध्ये पुन्हा एक टक्क्याने वाढून ४.८ टक्क्यांवर पोहोचला. २०२०-२१ मध्ये ६.२ टक्के, तर २०२१ -२२ मध्ये हा दर ५.२ टक्क्यांवर पोहोचला.

जानेवारी महिन्यात महागाईचा दर ६.०१ टक्के इतका होता. फेब्रुवारीमध्ये ६.०७ टक्के, मार्च ६.९५ टक्के, एप्रिल ७.७९ टक्के, मे ७.०४ टक्के, जून ७.०१ टक्के, जुलै ६.७० टक्के, ऑगस्ट ७.०० टक्के, सप्टेंबर ७.४१ टक्के

महागाई नियंत्रणासाठी काय केलं?

रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने रेपो दरांमध्ये वाढ होत आहे. मे पासून आतापर्यंत रेपो दर ४ टक्क्यांवरून ५.९० टक्के करण्यात आला. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. त्यामुळे दरवाढीला लगाम लागला. कच्च्या मालावरील आयातशुल्कात कपात केली. त्यामुळे उत्पादनखर्चात घट झाली. साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातले असून, गव्हाचीही निर्यात थांबवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here