म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनासंसर्ग झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपर्यंत ६० वर्षांवरील २० हजार ६६४ वयोवृद्ध व्यक्तींना झाला आहे. हे प्रमाण २२.५ टक्के आहे. या कालावधीत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी दोन हजार ८४७ मृत्यू हे या वयोगटातील आहेत.

आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, मुंबईतील २०० रुग्ण ९० ते १०० आणि एक हजार ८९३ रुग्ण ८० ते ९० या वयोगटातील आहेत. ७० ते ८० वयोगटातील ९२८ जणांचा मृत्यू करोनाच्या संसर्गामुळे झाला आहे, तर ६० ते ७० या वयोगटातील १२ हजार ५१३ जणांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत करोनाचा संसर्ग झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असताना राज्यामध्येही ६१ ते ११० या वयोगटातील ४२ हजार ७१९ ज्येष्ठ नागरिकांना लागण झाली आहे. त्यामध्ये ६१ ते ७० वयोगटातील २७ हजार २६७, ७१ ते ८० वयोगटामधील ११ हजार ८३४, तर ८१ ते ९० वयोगटातील तीन हजार २४०, तर ९१ ते १०० या गटात ३७७ जणांना करोनाची बाधा झाली आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या विविध प्रकारच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयोमानानुसार असतात. करोनाच्या संसर्गामध्ये शारीरिक व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये अधिक गुंतागुंत निर्माण होते. पहिल्या आठवड्यामध्ये सुधारणा दाखवत असलेल्या रुग्णाची प्रकृती अतिशय खालावते आणि तो कोसळतो, अशीही लक्षणे या वयोगटातील रुग्णांमध्ये येत असल्याचे निरीक्षण करोनारुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी नोंदवले.

या वयोगटात शरीरातील ऑक्सिजनची पातळीही महत्त्वाची असते. सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसत असलेल्या या वयोगटातील रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी असते व ती बदलत राहते, असे डॉ. चंदन मोहिले यांनी सांगितले. त्यामुळे टास्क फोर्स समितीतील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार धारावीसारख्या भागात ऑक्सिजनची पातळी मोजून गरज असलेल्या रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळेही व्हेंटिलेटवर जाण्यापूर्वी अनेकजणांना वाचवू शकलो होतो, असा अनुभव पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितला.

फोर्टीस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी, सहा मिनिटे पायी चालल्यानंतर थकवा जाणवत असेल तर शरीरामध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी असल्याची निश्चित शक्यता मांडता येणे सोपे असल्याचे सांगितले. चाळीमध्ये, तसेच अधिक लोकसंख्येच्या भागांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लक्षणे तीव्र होण्यापूर्वी विलगीकरणामध्ये ठेवता आल्यामुळेही अनेकांचे प्राण वाचवता आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here