Parbhani News : एकीकडे लम्पी आजारानं पशुपालक अजूनही त्रस्त आहेत. यातच परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शिराळा गावात मागच्या काही महिन्यांपासून अचानक बैलांच्या जीभ गळून पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकाराने गावकरी, पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ चक्रावून गेले होते. शेवटी तपासणी अंती सर्व अहवाल हे निगेटिव्ह आल्यानं हा कोणताही रोग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिराळ्यातील या 12 बैलांची जीभ कापल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता हे प्रकरण पोलिसात गेलं आहे.

12 बैलांची जीभ कापल्याची घटना

परभणीच्या सेलू तालुक्यातील एक हजार लोकवस्तीचे शिराळा हे गाव. या गावात मागच्या सहा महिन्यांपासून बैलाबाबत गंभीर प्रकार घडत आहे. रात्री पशुपालक चारा टाकून गेल्यानंतर सकाळी बैलांची जीभच चाऱ्याची ठिकाणी पडलेली दिसत आहे. सहा महिन्यात 12 बैलांची जीभ अशाच प्रकारे पडली आहे. या गावात इतरही जनावरं आहे. मात्र, केवळ बैलांसोबतच सातत्याने घडत असलेल्या या प्रकारामुळं गावकरी चांगलेच धास्तावले आहेत. हा नेमका कुठला रोग आलाय का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागासह परभणीच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाला या बाबत कळवले होते. मात्र, जीभ तुटून पडल्याच्या प्रकाराचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोणत्याही प्रकारचा रोग नसल्याचे अहवालतून स्पष्ट झालं आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानंतर याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यानं रोग नसल्याचे निष्पन्न 

शिराळ्यातील या प्रकारनंतर गावात पशुसंवर्धन विभाग आणि परभणीच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञांचे पथक गावात गेले होते. गावात जाऊन सदर बैलांच्या वेगवेगळ्या तपासण्या या तज्ज्ञांनी केल्या होत्या. ज्यामध्ये पडलेल्या जिभेची सूक्ष्मजीव शास्त्र तपासणी, अन्नपाण्याची तपासणी, स्थानिक मातीची तपासणी, पॅथॉलॉजी तपासणी करण्यात आली होती. मात्र, याचे सर्व अहवाल हे निगेटिव्ह आल्यानं हा रोग नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व निकषाअंती हा प्रकार कोणीतरी विकृतानं अथवा कुणीतरी चक्क या बैलांची जीभ कापली असल्याचा संशय दोन्ही विभागानं व्यक्त केला आहे.

गावात बैलांच्या जीभ पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. आता तज्ज्ञांनी हा प्रकार रोग नसल्याचे स्पष्ट केल्याने शेवटी गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. सेलू पोलीस ठाण्यात याबाबत भारतीय दंड संहिता 1860 कलम 429, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11(1)(G) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here