म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी दाते शोधण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, नालासोपारा येथील प्लाझ्मा बँकेला गेल्या १५ दिवसांत केवळ एक दाता मिळाला आहे. गोपनीयतेच्या नियमांमुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची कोणतीही माहिती सरकारकडून दिली जात नसल्यामुळे आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती शोधायच्या कशा, हा प्रश्न प्लाझ्मा बँकेसमोर उपस्थित झाला आहे.

जेव्हा एखादा रुग्ण करोनावर मात करून बरा होतो, तेव्हा त्याची माहिती प्लाझ्मा संकलनाच्या प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या रक्तपेढ्यांना मिळायला हवी, अशी मागणी सरकारी मान्यता मिळालेल्या खासगी रक्तपेढ्यांनी केली आहे. प्लाझ्मा दाते उपलब्ध करून देण्यासाठी संमती मिळालेल्या नालासोपारा येथील साथिया रक्तपेढीचे संचालक विजय महाजन यांनी या प्रक्रियेमध्ये सुस्पष्टता नसल्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. दात्यांची माहिती नसल्यामुळे फोन करून करोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे समुपदेशन करणेही शक्य होत नाही. तसेच दराच्या संदर्भातही निश्चित निकष ठरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ज्या रक्तपेढ्यांना मान्यता मिळाली आहे, ते प्लाझ्मा प्रक्रियेसाठी किती खर्च येईल, याचा अंदाज लावून खर्चाचे गणित मांडत आहेत. साथिया ब्लड बँकेने त्यासाठी २० हजार रुपये दर निश्चित केला आहे. करोनाच्या चाचण्यांप्रमाणेच प्लाझ्मा थेरपीसाठीही दर निश्चित करायला हवेत, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.

अवैध प्लाझ्मा संकलनावर चाप लावण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील रक्तपेढ्यांकडे माहिती मागितली होती. आत्तापर्यंत दहा जणांनी प्लाझ्मा दान केल्याची माहिती केईएम रुग्णालयाने दिली आहे. नायर रुग्णालयामध्ये ७० तर, लोकमान्य टिळक रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या १५ जणांनी प्लाझ्मा दान केले.

आत्तापर्यंत ९० प्लाझ्मा युनिट
डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यातील ९ रक्तपेढ्यांनी आत्तापर्यंत ९० प्लाझ्मा युनिट गोळा केले असून, त्यातील २३ युनिट प्लाझ्मा आहे. रक्तपेढ्यांनी १४ जुलै रोजी सकाळी ११पर्यंत ही माहिती देणे बंधनकारक होते. तरीही अद्याप राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी ही माहिती दिलेली नाही.

कोणत्या गटांचा समावेश?
करोना पॉझिटिव्ह असलेल्या, मात्र लक्षणे नसलेल्या व करोनावर मात करून बऱ्या झालेल्या काही व्यक्तींनी प्लाझ्मादान करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र गर्भपात झालेल्या, गर्भवती वा अशा गटात मोडणाऱ्या व्यक्तींचा प्लाझ्मा घ्यावा का, यासंदर्भात अद्याप सुस्पष्टता नसल्यामुळे त्यांनाही नाकारण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here