औरंगाबाद : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे कुटुंब विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना बघायला मिळत आहे. या वादाच्या नव्या अंकाला आता सुरुवात होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दोन तरुण नेते आमने-सामने येणार आहेत. सिल्लोडमध्ये या दोन्ही नेत्यांची ७ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे.

ठाकरे गटाकडून सिल्लोड पोलिसांकडे सभेसाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी सिल्लोडच्या जिल्हा परिषद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील सभा होणार आहे. त्यामुळे आधी आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आंबेडकर चौक आणि प्रियदर्शनी चौकाचे पर्याय देण्यात आले. त्यानंतर काही वेळाने आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी आंबेडकर चौकाची परवानगी निश्चित करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे कधीकाळी युवासेनेत एकत्र काम करणारे हे नेते आता ७ नोव्हेंबर रोजी सभेच्या निमित्ताने आमने-सामने येणार, हे निश्चित झालं आहे.

Maharashtra Politics: मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर आत्ता पद सोडलं असतं: आदित्य ठाकरे

ठाकरे-शिंदेंची नवी पिढी मैदानात

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि ठाकरे-शिंदे कुटुंबातील कटुता वाढत गेली. दोन्ही नेते एकमेकांविरोधात सभांमधून आक्रमक प्रहार करताना दिसत आहे. अशातच आता या नेत्यांचे पुत्रही आता जाहीर सभेच्या निमित्ताने आमने-सामने येणार असल्याने सिल्लोडमध्ये होणाऱ्या दोन्ही सभांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here