मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा डिझेलच्या किमतीत १७ पैशांची वाढ केली आहे. यामुळे डिझेलने दिल्लीत ८१.३५ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. डिझेल महागाईमुळे सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूकदार, मच्छिमार, शेतकरी यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

आज कंपन्यांनी डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. तर पेट्रोलचा दर स्थिर ठेवला आहे. यापूर्वी बुधवारी डिझेलच्या दरात १३ पैशांची वाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी आणि मंगळवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर सोमवारी डिझेलमध्ये ११ पैशांची वाढ केली होती. आज पुन्हा कंपन्यांनी डिझेलच्या दरात वाढ करून ग्राहकांना झटका दिला आहे.

इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये कायम असून डिझेलचा भाव ७९.५६ रुपयांवर गेला आहे. दिल्लीत डिझेलने ऐतिहासिक स्तर गाठला आहे. डिझेलचा भाव ८१.३५ रुपये असून पेट्रोल ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये असून डिझेल ७६.४९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ८३.६३ रुपये असून डिझेल दर ७८.३७ रुपयांवर कायम आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर गेल्या महिन्याच्या अखेरीस देशभरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कंपन्यांनी आठवडाभर इंधन दर स्थिर ठेवले होते. दरम्यान, जागतिक बाजारात देखील क्रूड ऑइलचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये यापूर्वी केलेल्या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माल वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर करते. डिझेल दरवाढीने यापूर्वीच माल वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दरवाढीचे संकेत दिले आहेत. मच्छिमार बोटींसाठी डिझेलचा वापर केला जातो. त्याशिवाय शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेलवरच चालतात. डिझेलमध्ये होत असलेली दरवाढ या घटकांचा खर्च वाढवणारी आहे. इंधन दरवाढीने येत्या काही आठवड्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. गेल्या महिन्याभरात २१ वेळा पेट्रोल आणि २३ वेळा डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

मागील पाच दिवसातील पेट्रोल-डिझेल दरवाढ

वार पेट्रोल डिझेल
सोमवार ५ पैसे वाढले ११ पैसे वाढले
मंगळवार स्थिर स्थिर
बुधवार स्थिर १३ पैसे वाढले
गुरुवार स्थिर स्थिर
शुक्रवार स्थिर १७ पैसे वाढले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here