राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिर्डीस्थित शिबिराचा पहिला दिवस संपन्न झाला. या शिबिरात अनेक मान्यवर वक्त्यांनी राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. याच शिबिराला शरद पवार प्रकृती अस्वस्थ्यामुळे ऑनलाईन हजेरी लावतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी पवारांना भेटल्यानंतर प्रसारमाध्यमांना भेटीचा तपशील देताना, पवारसाहेब उद्या शिर्डीला जाणार आहे, शिबिर आटपून ते पुन्हा काही चाचण्यांसाठी दवाखान्यात दाखल होतील, असं शिंदेंनी सांगत राष्ट्रवादीच्या गोटातली बातमी फोडली.
शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना लवकर बरं वाटावं, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना दीर्घायु लाभावं म्हणून मनोकामनाही केली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या शिबिरासंबंधी आम्ही दोघे बोललो. उद्या ते शिर्डीला जातील. शिबिराला मार्गदर्शन करुन ते पुन्हा दवाखान्यात काही चाचण्या करण्यासाठी दाखल होतील, अशी ‘बातमी’ मुख्यमंत्र्यांनी दिली.
न्यूमोनिया झाल्याने शरद पवार यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनी तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतले. उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील सभेला हजर राहतील.