जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखालील महाप्रबोधन यात्रा सध्या जळगाव जिल्ह्यात आहे. या यात्रेदरम्यान सुषमा अंधारे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी शरद कोळी यांनी केलेल्या आक्रमक भाषणांची राज्यभर मोठी चर्चा झाली. ही भाषणे प्रक्षोभक असल्याचा आरोप झाल्यानंतर आज मुक्ताईनगरच्या सभेआधी पोलिसांनी अंधारे यांना सभास्थळी जाण्यास मज्जाव केला. यावेळी सुषमा अंधारे आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाचीही झाली. या सगळ्या राड्यानंतर अंधारे यांची प्रकृती खालवल्याची चर्चा सुरू होती. मात्र यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी प्रतिक्रिया देत अंधारे यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं आहे.

‘दिवसभराच्या घडामोडीमुळे सुषमा अंधारे यांना थकवा आला आहे. अंधारे यांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्या विश्रांती घेत आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे,’ अशी माहिती संजय सावंत यांनी दिली आहे. ताई स्वतःच डॉक्टर आहेत. त्या इतरांवर इलाज करतात. त्यामुळे त्यांना डॉक्टरांची गरज लागणार नाही, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पवारांना भेटले अन् जे सिक्रेट राष्ट्रवादीने लपवलं, तेच शिंदेंनी हसत हसत सांगितलं!

पोलिसांचा गराडा आणि अंधारेंचा पारा चढला, नेमकं काय घडलं?

महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील बंडखोर आमदार-खासदारांचा समाचार घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेने आता उत्तर महाराष्ट्रातील जळगावात धडक दिली आहे. जळगावात पोहोचल्यानंतर बुधवारी अंधारे आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनी बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी युवासेनेचे नेते शरद कोळी यांनी काही आक्षेपार्ह शब्दही वापरले. त्यानंतर पोलिसांनी कोळी यांच्यावर जिल्हाबंदीची कारवाई केली.

शरद कोळी यांच्यावर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सुषमा अंधारे यांनाही आज सभास्थळी जाण्यापासून अटकाव केला. त्यानंतर संतापलेल्या अंधारेंनी पोलीस प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘माझा गुन्हा काय तो पोलिसांनी सांगावा. मी गुंड आहे की दहशतवादी? मला ताब्यात घेण्यासाठी ५०० पोलिसांनी माझ्या गाडीभोवती गराडा घातला आहे. ही दमनशाही आम्ही सहन करणार नाही. आम्ही त्यांना तोडीस तोड उत्तर देऊ,’ असं आव्हान सुषमा अंधारे यांनी पोलिसांसह राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here