ब्रह्मपुरी वनविभागातील दोन अवयस्क वाघीण शास्त्रीयदृष्ट्या सक्षम आहेत अशा निवडण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर देखरेख जारी असून नवेगाव-नागझिराच्या कुशीत वसविण्याच्या दृष्टीने योजना आहे. त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची मागील महिन्यात परवानगी आली असल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्याला मूर्त रूप देण्याची तयारी असून त्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थानांची मदत घेतली जात आहे. या प्रक्रियेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून दोन्ही वाघिणींना एकाच वेळी पकडणे गरजेचे आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. तेथून त्यांना नवेगाव-नागझिराच्या कुशीत वसविले जाणार आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात स्थानांतरणाची प्रक्रिया होणार असल्याचे संकेत आहेत. स्थानांतरणानंतर त्यांच्या हालचालींचा देखील अभ्यास केला जाणार आहे. सदर प्रयोग यशस्वी झाल्यास येथील ब्रह्मपुरीतील वाघ सोडता येणे शक्य होणार आहे.
व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वाचे
नवेगाव-नागझिरा हे डिसेंबर २०१३ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून अस्तित्वात आले. येथील वाघांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रयोग जास्त महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे व्याघ्र अभ्यासकांचे मत आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचे १ हजार ८० चौरस कि.मी. क्षेत्र असून सिंदेवाही, दक्षिण ब्रह्मपुरी, उत्तर ब्रह्मपुरी व तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत नियमित वाघांच्या हालचाली दिसून आल्या आहे. हल्ल्याच्याही घटना घडल्या आहेत. ब्रह्मपुरी वनविभागात नव्या आकडेवारीनुसार एकूण ५७ वाघ, २२ अवयस्क वाघ, तर सुमारे २२ बछडे असून सुमारे १०० बिबट असल्याची माहिती समोर आली आहे.