ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने (एनसीएससी) म्हटले की, करोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या संस्थांना रशियन हॅकर्स लक्ष्य करत आहेत. रशियन हॅकर्स हे रशियन गुप्तचर संस्थेचा भाग म्हणून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एनसीएससीचे संचालक पॉल चिचेस्टर यांनी हे कृत्य निंदनीय असून मेलवेअरचा वापर करून हॅकर्सने करोना लशीबाबत असलेली माहिती चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाने म्हटले की, हॅकिंग करणारे ‘एपीटी२९’ करोना संसर्गाशी संबंधित माहिती चोरत आहेत. कोझी बिअर म्हणून ओळखला जाणारा हॅकर्सचा गट हा रशियाच्या गुप्तचर संस्थेचा एक भाग आहे.
वाचा:
गुप्तचर संस्थांचे अधिकारी सातत्याने या चोरीच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत माहिती चोरीला गेली का, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या दाव्यानुसार, आतापर्यंत कोणतीही गुप्त माहिती चोरीला गेलेली नाही. अमेरिकेने याआधी कोझी बीअर हॅकिंग गटाबाबत माहिती मिळवली होती. हा गट रशियन सरकारशी निगडीत असलेल्या गटांपैकी एक आहे. या गटाने २०१६मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी काही इमेल चोरले असल्याचे समोर आले होते.
वाचा:
दरम्यान, याआधीदेखील अमेरिका, जर्मनीने चीनवर अशाप्रकारचे आरोप लावले होते. चीन आम्ही विकसित करत असलेल्या लशीची माहिती चोरत असल्याचा आरोप अमेरिका, जर्मनीने केला होता. चीन सरकारशी संबंधित हॅकर्सकडून हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times