वाचा:
काल दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या २२,८२८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील तब्बल १० हजार ३६६ होम क्वारंटाइन आहेत. घरी राहूनच ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत आहेत. याउलट रुग्णालयांमध्ये ९ हजार ७७१ रुग्ण आहेत. तर, नव्यानं उभारण्यात आलेल्या कोविड केंद्रांमध्ये अवघे २ हजार ६९१ रुग्ण उपचार घेत आहेत.
मोठ्या संख्येने रुग्णांनी घरी राहून उपचारास पसंती देणं हे करोनाची साथ ओसरत असल्याचं निदर्शक आहे, असं डॉक्टरांना वाटतं. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी होण्यामागे वेगळं कारण आहे, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पॉझिटिव्ह रुग्णांनी होम क्वारंटाइन होण्याचं प्रमाण मागील आठवड्यात अधिक वाढलं आहे. ‘करोनाच्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक रुग्ण हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील होते. गेल्या काही दिवसांपासून तेथील संसर्ग आटोक्यात आला आहे. सध्या संसर्गाचे प्रमाण उच्च मध्यमवर्गीय वस्त्या व टॉवरमधील रहिवाशांमध्ये जास्त दिसून येतोय. या लोकांना स्वत:ला विलग करण्यासाठी पुरेशी सोय असल्यानं ते रुग्णालयात दाखल होत नाहीत,’ असं महापालिकेच्या विशेष प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.
वाचा:
होम क्वारंटाइन रुग्णांवर उपचार करणारे ग्राण्ट मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. हेमंत गुप्ता यांनी या संदर्भातील आपला अनुभव सांगितला. ‘सुरुवातीचे काही दिवस कठीण असतात. अनेकांना ताप, खोकला, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटत असते. ते सातत्यानं आम्हाला फोन करतात. त्यांच्या आजारावर औषध सुचवण्याबरोबरच त्यांचं समुपदेशनही करावं लागतं. काही रुग्ण दिवसातून किमान ५० वेळा त्यांची ऑक्सिजन लेव्हल चेक करतात. एखाद्या रुग्णाचा खोकला आणि ताप कमी होत नसेल तर मी त्यांना एक्स रे काढण्याचा सल्ला देतो. आतापर्यंत मी अशा ५० रुग्णांवर उपचार केले आहेत,’ असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.
‘हृदयविकार किंवा फुफ्फुसाचा संसर्ग नसलेल्या मुलांनाही आम्ही घरीच राहण्याचा सल्ला देतो. त्यांना मल्टिव्हिटॅमिन्स, व्हिटामिन सी, झिंक दिले जाते. लक्षणं तीव्र होत असल्याचं दिसताच तातडीनं कळवा, असं पालकांना सांगतो,’ अशी माहिती हिरानंदानी रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉ. बिजल श्रीवास्तव यांनी दिली. अर्थात, रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी अत्यंत सावध राहावं, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times