IND vs ZIM : भारत सेमी फायनलमध्ये पोहोचणार का, हे आता झिम्बाब्वेच्या सामन्यानंतरच समजू शकते. भारतासाठी हा सामना करो या मरो, असाच असेल. हा सामना भारताने जिंकला तर काय होईल, पराभूत झाला तर काय होऊ शकतं आणि पावसाचा भारतावर काय परीणाम होऊ शकतो, या तिन्ही गोष्टींचे समीकरण आहे तरी काय एकदा जाणून घ्या….

भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला तर…
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात येईल. भारताचे सध्याच्या घडीला सहा गुण आहेत. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाला तर त्यांचे सात गुण होतील. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे पाच गुण आहेत. त्यामुळे त्यांनी जर आपला अखेरचा सामना जिंकला तर त्यांचे आणि भारताचे समान सात गुण असतील. त्यावेळी ज्या संघाचा रनरेट जास्त आहे तो संघ अव्वल स्थानावर राहील आणि इंग्लंडशी दोन हात करेल, तर दुसऱ्या स्थानावरील संघ हा न्यूझीलंडचा सामना करेल.
भारताचा या सामन्यात पराभव झाला तर…
भारताला जर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर त्यांचे आव्हान कदाचित संपुष्टात येऊ शकते. भारताचा पराभव झाला तर यापूर्वी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यांमध्ये नेमकं काय घडलं ते पाहावं लागेल. जर दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला असेल तर तो थेट उपांत्य फेरीत दाखल होईल. पण जर पाकिस्तानने विजय मिळवला असेल तर भारताला धक्का बसू शकतो. कारण पाकिस्तानने अखेरचा सामना जिंकला तर त्यांचे सहा गुण होतील आणि भारताचेही तेवढेच गुण राहतील. त्यावेळी रनरेट पाहिला जाईल. सध्याच्या घडीला पाकिस्तानचे भारतापेक्षा गुण कमी असले तरी त्यांचा रनरेट मात्र चांगला आहे. सध्याच्या घडीला भारताचा रनरेट हा ०.७३० एवढा आहे, तर पाकिस्तानचा रनरेट हा १.११७ असा आहे. या गोष्टीचा अर्थ जर भारत अखेरचा सामना हरला आणि पाकिस्तान जिंकला तर टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर पडू शकते. त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी महत्वाचे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारत आणि झिम्बाब्वे सामन्यात नेमकं काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारताने सामान जिंकला तर…
भारताने जर झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकला तर ते आपल्या गटात आठ गुणांसह अव्वल स्थानावर राहतील आणि थेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचतील. भारतीय संघाला यावेळी विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडशी दोन हात करावे लागतील.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.