मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज, रविवारी जाहीर होणार आहे. गुंदवली येथील महापालिका शाळेत सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी ३ नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले. पोटनिवडणुकीत जेमतेम ३१ टक्के मतदान झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत लटके यांच्या विरोधात नोटाचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेची ओळख बनलेल्या धनुष्यबाण चिन्हाऐवजी मशाल चिन्हावर लढणाऱ्या लटके यांना पोटनिवडणुकीत मतदारांनी कसा प्रतिसाद दिला, याविषयी इतर पक्षांबरोबरच ठाकरे यांच्या पक्षातही उत्सुकता आहे.

अंधेरीतील गोखले पूल उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; ‘पश्चिम द्रुतगती’साठी सहा पर्याय

सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच साडेआठ वाजता मतदानयंत्रातील (ईव्हीएम) मतांच्या मोजणीला सुरुवात केली जाईल. ‘ईव्हीएम’च्या मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार असून प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या ‘एलसीडी स्क्रीन’वर दाखविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

बांधकाम क्षेत्र वापरावर ‘बुलेट’ स्थानकामुळे बंधन; ‘एमएमआरडीए’ची ३,८८९ कोटींची मागणी

मतमोजणीसाठी २०० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतील. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलिस दलाचे ३०० अधिकारी, कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here