पुणे : राज्यातील सत्तातंराचे केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा भेट देणार आहेत. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते पुढील आठवड्यात गुवाहाटीला जाणार आहेत. त्या तयारीसाठी त्यांचे सहकारी गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत.

राज्यातील सत्तांतराच्या वेळी शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार एक आठवडा गुवाहाटी येथे राहिले होते. या वेळी शिंदे यांच्यावर शिवसेनेतून (ठाकरे गट) कामाख्या देवीला ४० रेडे पाठवले असल्याची टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी ‘कामाख्या देवीचे आशीर्वाद आमच्यासोबत असून, देवीने काय केले हे सर्वांनी पाहिले आहे,’ असे म्हटले होते. आपण पुन्हा एकदा देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार ते पुढील आठवड्यात गुवाहाटीला जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींची एक कृती आणि उद्धव ठाकरेंनी थेट मध्यावधी निवडणुकांचा अंदाज बांधला; नेमकं काय घडलं?

शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तयारी करण्यासाठी युवा सेनेचे सचिव किरण साळी, बाजीराव चव्हाण, शिंदे यांचे स्वीय सहाय्यक; तसेच इतर पदाधिकारी गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आसामच्या पोलिस महासंचालकांची भेट घेण्यात येणार आहे. शिंदे सत्तांतरावेळी गुवाहाटीला असताना त्यांना मदत केलेल्या सर्व व्यक्तींची ते या वेळी आवर्जून भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अयोध्या दौरा आधी की गुवाहाटी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. अयोध्या दौरा आधी, की गुवाहाटी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, या दोन्ही धार्मिकस्थळी जाऊन ते सहकाऱ्यांसोबत दर्शन घेतील, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here