अॅडलेड : साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात नेदरलँडने पराभवाचा धक्का देत दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवाने भारताचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित झाला आहे. आफ्रिकेने आजचा सामना जिंकला असता तर भारताला झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं आवश्यक होतं. मात्र आफ्रिका विश्वचषकातून बाहेर पडल्याने भारताचा मार्ग सुकर झाला आणि झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सुरू होण्याआधीच भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे.

अॅडलेडच्या मैदानात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडने आज दक्षिण आफ्रिकेला १३ धावांनी धूळ चारली. नेदरलँडने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत १४५ धावाच करता आल्या. मोठ्या स्पर्धांमध्ये ऐन मोक्याच्या वेळी पराभूत होण्याचा इतिहास असणाऱ्या आफ्रिकेच्या संघाला चोकर्स म्हणून हिणवलं जातं. त्यातच आजच्या सामन्यात नेदरलँडसारख्या तुलनेनं दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाकडून पराभव सहन करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातून आव्हानही संपुष्टात आलं आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…

आफ्रिकेच्या पराभवाने सेमीफायनलमध्ये पोहोचलेला भारताला आजच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला तरी विशेष फरक पडणार नाही. कारण तीन सामन्यांतील विजयासह भारताचे सध्या ६ गुण आहेत. मात्र सेमीफायनलमध्ये आत्मविश्वासाने एंट्री घेण्यासाठी झिम्बाब्वेला अस्मान दाखवण्याचा प्रयत्न रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा असणार आहे.

दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात अनेक मोठे उलटफेर झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडने गट क्रमांक एकच्या अखेरच्या साखळी लढतीत शनिवारी श्रीलंकेचा पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडने गटातील दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या नेट रनरेटच्या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलियास मागे टाकले. गतवर्षी अमीरातीत झालेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. यंदाच्या स्पर्धेत ते सलामीच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाले आणि त्यातून पूर्ण सावरणे ऑस्ट्रेलियास जमले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here