पिंपरी : पिंपरी चिंचवड हद्दीतील भोसरी परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वेबपोर्टलला काम करणाऱ्या पत्रकाराने त्याच्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या करत तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी असणाऱ्या व्यक्तीनेच भोसरी पोलीस ठाण्यात मैत्रीण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांना शंका आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपी पत्रकाराला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास पोपट तांबे ( वय ३०, रा. दिघी रोड, भोसरी, मूळ रा. तांबेवाडी, टाकली मानुर, ता. पाथर्डी, अहमदनगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून चंद्रमा सिमांचल मुनी (वय २८ रा.ओडिसा) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लक्ष्मण गोविंद डामसे यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे हादरलं! वास्तुशास्त्र सल्लागाराच्या खूनानंतर १७व्या दिवशी गूढ उलगडलं, आधी कॉफी पाजली नंतर…

याबाबत भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमा ही ओडिसा येथील राहणारी होती. काही दिवसांपासून ती भोसरी परिसरात वास्तव्यास होती. मात्र आपल्या वडिलांच्या नावावर असलेल्या दोन घरांपैकी एक घर तिच्या नावावर करून द्यावं, तसंच पैसे आणि दागिनेही द्यावे मला द्यावे, अशी मागणी तिने पत्रकार रामदास तांबे याच्याकडे केली. या कामात मदत नाही केली तर लैंगिक अत्याचाराचा गुन्ह्यात तुला अडकवून टाकेल अशी धमकी संबंधित आरोपीला दिली. यावरून दोघांमध्ये अनेकदा वादही होत होते. मात्र तिच्यापासून कायमची सुटका करण्यासाठी रामदास तांबे याने थेट चंद्रमा मुनी हिला संपवण्याचा प्लॅन केला. तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसरीपासून काही अंतरावर असणाऱ्या केळगाव परिसरात फिरण्यासाठी नेले आणि तिथेच तिची हत्या केली. त्यानंतर भोसरी पोलिसात मैत्रीण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी घटनेची दखल घेत तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांना संशय आल्याने संपूर्ण प्रकरणाचा तपास तक्रारदाराभोवतीच केंद्रित केला. तक्रारदार असलेल्या रामदास तांबे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here